Now the ash slips through the flyover route in the east | आता पूर्व भागातील उड्डाणपूल मार्गातून राख गळती
आता पूर्व भागातील उड्डाणपूल मार्गातून राख गळती

ठळक मुद्देदेव्हाडी येथील प्रकार : प्रशासन मूग गिळून गप्प, कंत्राटदार व अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी-गोंदिया मार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे. यापूर्वी तुमसर-खापा मार्गावरील पोचमार्गातून राखेची गळती सुरू होती. दोन्ही पोचमार्ग येथे धोकादायक ठरले आहे.
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील नवनिर्मित उड्डाणपूल बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या देव्हाडी गावातून गोंदियाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची कामे सुरू आहे. भरावात येथे राख घातली गेली. पाऊस बरसल्याने नवनिर्मित पोचमार्गातून मोठ्या प्रमाणात राखेची गळती सुरू आहे. राखेच्या गळतीमुळे उड्डाणपूलाचा पोचमार्ग पोकळ होण्याची शक्यता अधिक आहे. वाहून गेलेल्या स्थळावर कंत्राटदार पुन्हा राखेचा भराव करीत आहे, परंतु कायमस्वरूपी राखेची गळती थांबविण्याच्या उपाययोजना संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही. सदर प्रकरणी स्थानिक कंत्राटदारांची तांत्रिक पथक काहीच बोलायला तयार नाही. याविषयी परिसरातील अनेकांनी चूक लक्षात आणल्यानंतरही स्थिती जैसे थे आहे.

उड्डाणपूल बनला चर्चेचा विषय
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल राख गळतीमुळे चर्चेत आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयापर्यंत लेखी तक्रारी दिल्या. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदारांपर्यंत तक्रारी पोहचल्या. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु चौकशी झाली नाही. नागरिकांत येथील उड्डाणपूल चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिकांनी उड्डाणपूलावरून वाहतूक करू नये, असा निर्णय घेतला आहे, हे विशेष.

रस्त्यावरील राख देताहे अपघाताला आमंत्रण
राख रस्त्यावर पसरल्याने रस्ता निसरडा झाला आहे. दुचाकी व चारचाकी वाहने येथे अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात येथे दुचाकीस्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. साखर कारखान्यातील कर्मचारी संजय बावनकर थोडक्यात बचावले. येथे संबंधित विभाग व कंत्राटदार आमचे काहीच होत नाही, असे निर्ढावलेले असून प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. पांदन रस्त्याची तक्रार झाल्यावर प्रशासन खळबळून जागा होते. येथे राष्ट्रीय महामार्गावरील पूल बांधकामाची कुणीच दखल घेत नाही. हा संशोधनाचा विषय आहे.


Web Title: Now the ash slips through the flyover route in the east
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.