पोषण आहार वितरणात घोळ
By Admin | Updated: July 3, 2014 23:22 IST2014-07-03T23:22:48+5:302014-07-03T23:22:48+5:30
स्थानिक समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही चौकशी करण्यात आली नाही.

पोषण आहार वितरणात घोळ
लाखनी : स्थानिक समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्यात तर येत नाही ना? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेने केला आहे.
पोषण आहार वाटपात घोटाळा झालेला आहे. यासाठी नेमके कोण जबाबदार आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दि. १ एप्रिल रोजी पोषण आहाराचा शाळेला पुरवठा करण्यात आलेला आहे. माहिती अधिकारात तक्रारकर्त्यांनी माहिती मागीतल्यानंतर मुख्याध्यापकांनी खोटी माहिती दिली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन शाखा भंडारा यांच्याकडून साहित्य उचलल्याची खरी पावती मिळाली. मुख्याध्यापकांनी दिलेली पावती व जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेली पावती यात उचल केलेल्या साहित्यात तफावत दिसून येत आहे.
हरभरा व तुरडाळीची शाळेने उचल केलेली नाही मोहरी, मिरची पावडर, हळद पावडर, आयोडीनयुक्त मिठाची उचल केलेली नाही. जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या पावतीमध्ये सर्व मालाची मोठ्या प्रमाणात उचल केलेली आहे.
शाळेत गरीब मुलांना दुपारचे भोजन मिळावे यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना व पोषण आहार योजना सुरु केली आहे. परंतु मुलांच्या आहाराची अफरातफर करीत आहे.
रिपब्लिकन सेना आक्रमक
समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.आर. कोल्हारे यांनी शालेय पोषण आहारात अफरातफर केल्याचा आरोप करुन दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम, तुलशीदास गेडाम, भजनदास मेश्राम, राहुल मेश्राम यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)