‘नोटबंदी’ने बैलबाजाराची उलाढाल थांबली

By Admin | Updated: December 26, 2016 00:56 IST2016-12-26T00:56:50+5:302016-12-26T00:56:50+5:30

शेतकऱ्यांचा जीवाभावाच्या पशूधनाची खरेदी विक्री खरीप हंगामापूर्वी करण्यात येते.

'Notebank' stopped the turnover of the bull market | ‘नोटबंदी’ने बैलबाजाराची उलाढाल थांबली

‘नोटबंदी’ने बैलबाजाराची उलाढाल थांबली

प्रशांत देसाई   भंडारा
शेतकऱ्यांचा जीवाभावाच्या पशूधनाची खरेदी विक्री खरीप हंगामापूर्वी करण्यात येते. मात्र महिनाभरापूर्वी केंद्र सरकारने केलेल्या ५०० व १००० रु. च्या नोटबंदीमुळे या खरेदी विक्रीवर मोठा विपरीत परिणाम पडला आहे. ७५ टक्क्याने खरेदी विक्रीत घट आली आहे. पशुपालक रोखीच्या व्यवहार करण्यावर भर देत असला तरी अनेकांकडे रोख नसल्याने बैलबाजार सध्या अडचणीत सापडला आहे.
केंद्र सरकारने देशातील काळा बाजार रोखण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानकपणे बंद केल्या. यामुळे सर्वत्र मोठा रोष व्यक्त केल्या जात आहे. अनेकांना आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका ग्रामीणांसह शहरी नागरिकांनाही बसत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
रविवारला भंडारा येथील बैल बाजाराचा फेरफटका मारला असता नोटबंदीचा परिणाम या बैलबाजारावर खरेदी करणाऱ्यावर दिसून आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा बैलबाजार म्हणून ओळखला जाणाऱ्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या बैलबाजारातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत होती. नोटबंदीपूर्वी या बैलबाजारातून महिन्याला सुमारे २० ते २५ लाखांची आर्थिक उलाढाल होत होती. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यासह लगतच्या मध्यप्रदेशातूनही येथे बैलांची खरेदी विक्री करण्याकरिता पशुपालक येत होते.
आठवड्यातून एकदा भरणाऱ्या या बैलबाजारातून सुमारे दीडशे ते दोनशे जनावरांची खरेदी विक्री होत होती. यातून कृषी उत्पन्न बाजार समितीलाही मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत होता. या बैलबाजारात गाय, म्हैस, गावरान बैल, मुर्रा म्हैस, जर्सी बैल, वगार अशा प्रकारचे पाळीव जनावरे विक्रीकरिता पशुपालक आणतात. १० हजार ते ५० हजार रुपयापर्यंतच्या किमतीचे जनावरे या बाजारातून खरेदी विक्री करण्यात येत होती. आठवड्यातून सुमारे दीडशे ते दोनशे जनावरांची विक्री होत होती. यातून लाखो रुपयांची आवक प्राप्त होत होती. मात्र नोटबंदीनंतर या बैलबाजारावर जणू अवकळाच पसरली आहे.
सध्या खरेदी विक्रीसाठी रोख पशूपालकांकडे नसल्याने किंवा बँकांमधून त्या तुलनेत रक्कम प्राप्त होत नसल्याने पशुधनाची खरेदी विक्री करताना रोकडची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक सौदे झाल्यानंतर रोख रक्कम नसल्याने अनेकांना आल्यापावली परतावे लागत आहे. सध्या जनावरांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. येथे आता केवळ ५० ते ६० जनावरांची आठवड्याला विक्री होत असल्याची माहिती येथील एका दलालाने ‘लोकमत’ला दिली.

एक रुपयाच्या बयाणात सौदा
समाजात अनेक खरेदी विक्री नित्याने होतात. त्या खरेदी विक्रीसाठी अनामत रक्कम म्हणून मोठी रक्कम मोजावी लागते. मात्र येथील बाजारात बयाणा म्हणून पशुधनाच्या खरेदी विक्रीबाबत केवळ एक रुपयात सौदा पक्का समजल्या जातो. विश्वासपूर्ण व्यवहार इथे होतो. मात्र सध्या नोटबंदीची अडचण या बयाणा सौद्यालाही पडत आहे. रोख रकमेने खरेदी करायची झाल्यास पशुधनच्या किंमतीत कपात करण्यात येत आहे. तर धनादेशाद्वारे किंवा उधारीवर व्यवहार करायचे झाल्यास खरेदीदाराला अधिकची रक्कम चुकवावी लागत असल्याचा प्रकार येथे दिसून आला.

व्यवहार आला अडचणीत
पशुधनाची खरेदी विक्री करण्याकरिता दूरवरून पशुपालक भंडारा बाजारात दाखल होतात. त्यांच्या पशुधनाला योग्य भाव मिळावा अशी त्यांची भावना असते. त्यानुसार दलाली करणारे काही इसम त्यांच्या इच्छेनुसार रक्कमही मिळावी यासाठी प्रयत्न करतात. मात्र सध्या नोटबंदीचा फटका येथील बैलबाजाराला बसला आहे. अनेक खरेदीदार धनादेशाच्या माध्यमातून हा व्यवहार साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पशुपालकांना धनादेशाऐवजी रोकडची गरज समोर करून धनादेश स्वीकारीत नाहीत. धनादेशासाठी बँकांची अडचणही निर्माण होऊन शेवटी पैशाची उचल करण्याकरिता बँकांमध्ये चक्कर मारावी लागत असल्याने व्यवहार अडचणीत आले आहेत.
 

Web Title: 'Notebank' stopped the turnover of the bull market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.