२० दिवसांपासून चुकारे नाही
By Admin | Updated: December 12, 2015 00:34 IST2015-12-12T00:34:08+5:302015-12-12T00:34:08+5:30
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

२० दिवसांपासून चुकारे नाही
शेतकरी संकटात : १७ हजार ५५४ क्विंटल धानाची खरेदी
संजय साठवणे साकोली
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. दुष्काळाच्या छायेत जीवन जगताना दुसऱ्याच्याही पोटाला दोन घास मिळावे यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था सरकार कोणतेही आले तरीही तशीच राहते. यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली. पाऊस नाही, धानाला किडीने ग्रासले. अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आले तेही अत्यल्प. तरीही केंद्रावर धान देऊन २० दिवस लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मागीलवर्षी शेतकऱ्यांना आलेल्या तोट्यातून शेतकरी कसाबसा सावरला. कर्ज काढून यावर्षी शेती केली मात्र यावर्षी निसर्गाने दगा दिला. मात्र शेतकऱ्याची जमेल तसे प्रयत्न करून वेळेचा सामना केला. पीक वाचविले. आलेले उत्पन्न शासकिय धान खरेदी केंद्रावर विकले.
विर्शी व साकोली येथील धान खरेदी केंद्र १६ नोव्हेंबरला सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही केंद्रावर १७ हजार ५५४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. या धानाची एकूण किंमत २ कोटी ६९ लाख रूपये एवढी असून २१ नोव्हेंबरपर्यंत साकोली केंद्रावरील ४३ लाख ७६ हजार २७० रुपये तर विर्शी केंद्रावरील शेतकऱ्यांचे १२ लाख ६२ हजार ३७३ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित रकमेची हुंडी केंद्रातर्फे तयार असली तरी शासनातर्फे पैसेच आले नसल्याने शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळू शकलेले नाही.