जिल्ह्यात दहा दिवसात कोरोनाचा बळी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:41+5:302021-03-07T04:32:41+5:30
भंडारा - राज्यात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली असताना भंडारा जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्ण नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा व आरोग्य ...

जिल्ह्यात दहा दिवसात कोरोनाचा बळी नाही
भंडारा - राज्यात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली असताना भंडारा जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्ण नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा व आरोग्य प्रशासनाला यश आल्याचे दिसत आहे. गत दहा दिवसात कोरोनाने एकाही व्यक्तीचा बळी गेला नाही तर गत फेब्रुवारी महिन्यात केवळ पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के असून मृत्यूदर २.३५ टक्के एवढा आहे. प्रशासन विविध उपाययोजना करीत असल्या तरी नागरिक मात्र बेदरकारपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सर्वत्र दिसते. भंडारा जिल्हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुरुवातीपासुनच सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊननंतर २७ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतरही ३ महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. परंतु त्यावरही जिल्हा प्रशासनाने मात केली. नवीन वर्षापासून तर कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. गत जानेवारी महिन्यापासून ३८ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात जानेवारी महिन्यात ३१ आणि फेब्रुवारी महिन्यात ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मार्च महिन्यात पाच दिवसात कुणाचाही मृत्यू झाला नाही. गत २४ फेब्रुवारी रोजी एका रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. आरोग्य विभागाने कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात १ लाख ४० हजार ३५० व्यक्तींच्या घशातील स्बॅबची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ८९१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार ८९१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ३२७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.
बॉक्स
शनिवारी ४७ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात शनिवारी १५७४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २९, तुमसर ११, लाखनी ४, मोहाडी, पवनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी १ असे ४७ रुग्ण आढळून आले आहेत. १४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या ३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. भंडारा तालुक्यात १९३, मोहाडी १५, तुमसर ५५, पवनी २६, लाखनी ४१, साकोली ८, लाखांदूर ५ असे तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण
जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. त्यात भंडारा येथील इंद्राक्षी आय केअर हाॅस्पिटल, स्पेस हॉस्पिटल, नाकाडे हाॅस्पिटल, लक्ष हॉस्पिटल, तुमसर येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि साकोली येथील पार्वती हाॅस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. प्रती डोज प्रती व्यक्ती २५० रुपये लसीसाठी आकारले जात आहे.