मुदत संपूनही मिळाली नाही रक्कम
By Admin | Updated: December 5, 2015 00:46 IST2015-12-05T00:46:08+5:302015-12-05T00:46:08+5:30
संस्थेत पाई-पाई जमा करून भविष्यात मोठी रक्कम उचल करण्याचे स्वप्न बघणाऱ्या लहान गुंतवणूकदारांची गोची झाली आहे.

मुदत संपूनही मिळाली नाही रक्कम
भंडारा : संस्थेत पाई-पाई जमा करून भविष्यात मोठी रक्कम उचल करण्याचे स्वप्न बघणाऱ्या लहान गुंतवणूकदारांची गोची झाली आहे. खरबी नाका येथील दि विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था येथील व्यवहारामुळे परिसरातील नागरिकांचा पैसा अडचणीत सापडला आहे. लक्षावधीत रूपयांची रक्कम मुदत संपूनही न मिळाल्याने ठेवीदार तथा सदस्य संकटात सापडले आहे.
यासंदर्भात संस्थेतील ग्राहकांनी शाखा व्यवस्थापक यांच्याकडे निवेदन सादर करून नित्यनिधी खात्यातून तसेच अन्य संबंधित खात्यातून रक्कम परत मिळण्याबाबत मागणी केली आहे. भंडारा तालुक्यातील खरबी येथे ही संस्था असून या संस्थेत परिसरातील लोकांनी मोठ्या विश्वासाने रक्कम जमा केली. मात्र सन २००४ पासून संस्थेद्वारे करण्यात आलेले कर्जवाटप व त्यानंतर थकित असलेली वसूली याचा सरळसरळ फटका सामान्य ग्राहकांना बसला आहे. मोठ्या प्रमाणात लिमिटबाहेर कर्ज वाटप करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमावलीचा भंग केला काय, असा प्रश्नही खातेदारांनी विचारला आहे. अर्ज करून व विड्राल फॉर्म भरूनही रक्कम मिळत नसल्याने दाद कुणाकडे मागायची, असा सवाल उपस्थित होत आहे.
कित्येक खातेदारांचे मुदत संपूनसुद्धा पैसे परत मिळाले नाही. खातेदारांनी पैशाची परतफेड करण्याबाबत लेखी मागणी केली. परंतु आज या उद्या या असे तोंडी सांगून संस्थेचे कर्मचारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहे. गरज असतानाही खातेदारांना स्वत:चीच रक्कम वटविता येत नसल्याचे सांगितले. दिवाळीसारखा सणही अंधारात गेला. मात्र संस्थेने निधी वटवून दिला नाही. दुसरीकडे संस्थेच्या कर्मचाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांची दिवाळी जोमात गेली. काही महिन्यांपुर्वीच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात संस्थेच्या काही पदाधिकाऱ्याने लक्षावधी रूपयांचे कर्ज उचल केले. त्यातील काही रक्कम परतफेडही केली. एकीकडे सामान्य ग्राहकांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असून दुसरीकडे लक्षावधी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात येत असल्याचा आरोपही तक्रारकर्त्यांनी केला आहे. संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून खातेदार व ठेवीदारांची रक्कम परत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यामध्ये संजय हटवार, गणेश दादुलवाडे, नरेश वंजारी, वंदना हटवार, मंगल वानखेडे, विवेकानंद हटवार, नामदेव वाघमारे, सोमा गायधने, राजकुमार मोथरकर, कुंडलीक कुंभरे, श्रावण हटवार, अमृत मोथरकर, नंदकिशोर आकरे, गंगाधर मारबते, भूमेश्वर महाकाळकर आदी खातेदारांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)