वन्यप्राणी मानवी संघर्षात नऊ जणांचा बळी
By Admin | Updated: October 29, 2014 22:43 IST2014-10-29T22:43:52+5:302014-10-29T22:43:52+5:30
भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. मानव वन्यप्राणी संघर्षात पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी

वन्यप्राणी मानवी संघर्षात नऊ जणांचा बळी
पाच वर्षांत तीन कोटींची नुकसान भरपाई : १२७ मनुष्य जखमी, ३५१ पाळीव जनावरे फस्त
प्रशांत देसाई - भंडारा
भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. मानव वन्यप्राणी संघर्षात पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी तर १२७ व्यक्ती जखमी, ३५१ पशुधन ठार तर ३,१०२ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पाच वर्षात नुकसानीपोटी भंडारा वनविभागाने ३५८९ प्रकरणात २ कोटी ९१ लाख ६ हजार ७०० रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे ६१८ प्रकरण वनविभागाकडे आले. त्यात ३३ लाख ४५ हजार ४५ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांनी पशुधनावर हल्ला करून ४१ पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे.
त्या मोबदल्यात २ लाख ५७ हजार ४०५ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ला करून २७ व्यक्तींना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वनविभागाने ३ लाख २८ हजार ५७५ रूपयांची भरपाई संबंधीतांच्या नातेवाईकांना करण्यात आली आहे. सहा महिन्यात ६८६ प्रकरणांसाठी वन विभागाने ३९ लाख ३१ हजार २५ रूपयांचे नुकसान वाटप केले आहे.
सन २०१०-११ पासून सप्टेंबर २०१४ या पाच वर्षाच्या दरम्यान वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेतपिक, पशुधन व मानवहानी केली आहे. भंडारा वन विभागात ३ हजार ५८९ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहेत.
त्यातील नुकसानग्रस्तांना २ कोटी ९१ लााख ६ हजार ७०० रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ४१ लाख ८२ हजार ६२५ रूपये, पशुधनाच्या नुकसानीसाठी २४ लाख ९३५ रूपये, जखमी मनुष्यांना २२ लाख ३३ हजार १४० रूपये तर ठार झालेल्या नऊ व्यक्तींच्या कुटूंबियांना २१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे.
२०१०-११ मध्ये वन्यप्राण्यांनी ८१ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले, ७७ पशुधन ठार, २७ व्यक्ती जखमी तर दोघांचा बळी घेतला. वनविभागने १८७ प्रकरणात १६ लाख ९१ हजार ६८४ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केली. २०११-१२ मध्ये शेतपिकांची २२५ प्रकरणे, ९६ पशुधन ठार, ४३ व्यक्ती जखमी तर तिघांचा मृत्यू झाला. ३६७ प्रकरणात वनविभागाने २७ लाख ६ हजार ८४७ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले.
सन २०१२-१३ मध्ये ७८६ शेतपिकांची नुकसानीसंबंधी प्रकरणे, ६४ पशुधन ठार, १६ व्यक्ती जखमी तर तिघांचा बळी वन्यप्राण्यांनी घेतला. या ८६९ प्रकरणात ४८ लाख २७ हजार ९५२ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. २०१३-१४ मध्ये वन्यप्राण्यांनी १ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. ७३ पशुधन ठार, १४ व्यक्ती जखमी तर एकाचा बळी घेतला. १ हजार ४८० प्रकरणात वनविभागने ७७ लाख ५९ हजार १९२ रूपयांची मदत दिली आहे.