जिल्ह्यात नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर तब्बल ११७७ व्यक्ती पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:52+5:302021-04-08T04:35:52+5:30
भंडारा : जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्येचा स्फोट होत असून, बुधवारी तब्बल ११७७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर नऊ जणांचा कोरोनाने ...

जिल्ह्यात नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर तब्बल ११७७ व्यक्ती पाॅझिटिव्ह
भंडारा : जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्येचा स्फोट होत असून, बुधवारी तब्बल ११७७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर नऊ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णाची नोंद बुधवारी झाल्याने प्रशासनासह नागरिकही धास्तावले आहेत.
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. बुधवारी ७१९४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एकट्या भंडारा तालुक्यात ४३६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. मोहाडी तालुक्यात १३१, तुमसर २०५, पवनी १३३, लाखनी १४४, साकोली ७३ आणि लाखांदूर तालुक्यात ६६ असे ११७७ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ५९२ रुग्णांची नोंद झाली असून, भंडारा तालुक्यात दहा हजार १२७, मोहाडी १९९४, तुमसर ३०७१, पवनी २६११, लाखनी २५३३, साकोली २२५५ आणि लाखांदूर तालुक्यात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १६ हजार ४४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ६७४० व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यात तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यातील ५५ वर्षीय आणि ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तुमसर तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला असून, त्यात एक ५५ वर्षीय, ४७ वर्षीय आणि ८४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मोहाडी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला असून, त्यात ७५ वर्षीय, ५२ वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पवनी तालुक्यातील एका ५८ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात आणताना वाटेतच मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ६७४० ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यात २८९९, मोहाडी ७५४, तुमसर ९३३, पवनी ८२४, लाखनी ७७१, साकोली ३५४ आणि लाखांदूर तालुक्यात २६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. भंडारा शहरासह जिल्ह्यात वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र त्यानंतरही नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी रुट मार्च काढले जात आहेत.
भंडारा शहरात १० कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आढळत असून, त्यातही सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. शहरात सध्या १० कंटेन्मेंट झोन असून, प्रशासनाची त्यावर करडी नजर आहे. शहराच्या विविध भागात असलेल्या या कंटेन्मेंट झोनला नगरपरिषदेचे पथक नियमित भेटी देऊन पाहणी करीत आहेत.
होम क्वाॅरण्टाइन रुग्णांवर करडी नजर
भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात होम क्वाॅरण्टाइन कोरोना रुग्ण आहेत. काही रुग्ण बाहेर भटकत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे आता त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. नगरपरिषदेने ५२ अंगणवाडी सेविकांची यासाठी नियुक्ती केली आहे. तीन सुपरवायझर आणि दोन नोडल अधिकारी या होम क्वाॅरण्टाइन रुग्णांवर वाॅच ठेवणार आहेत. प्रत्येकांच्या घरी भेट देऊन त्यांची तपासणी केली जाईल. रस्त्यावर भटकंती करताना असा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
भंडारा शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे. कोविड नियमांचे पालन करावे. रस्त्यावर गर्दी करू नये. लाॅक द चेन नियमांचे पालन करण्यासाठी चार पथके तयार असून, शहरातील विविध भागात भेटी देऊन तपासणी करणार आहेत.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद, भंडारा