वृत्तपत्र वितरक बनला पोलीस उपनिरीक्षक
By Admin | Updated: May 19, 2017 00:53 IST2017-05-19T00:53:30+5:302017-05-19T00:53:30+5:30
घरात अठराविश्व दारिद्रय असूनही मनात ध्येयाच्या बळावर परिस्थितीवर मात करून वृत्तपत्र वितरकाचे

वृत्तपत्र वितरक बनला पोलीस उपनिरीक्षक
मुकेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : घरात अठराविश्व दारिद्रय असूनही मनात ध्येयाच्या बळावर परिस्थितीवर मात करून वृत्तपत्र वितरकाचे काम करणाऱ्या तरूणाने पोलिस उपनिरिक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. दिघोरी (मोठी) येथील राजेश वसंता उंदीरवाडे असे या उमद्या तरूणाचे नाव आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून २००८ ते २०१० मध्ये भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पथकात होमगार्डमध्ये उत्तमरित्या कार्य पार पाडले.
यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलीस शिपाई या पदावर निवड झाली. नक्षलग्रस्त भागात आपले कर्तव्य बजावत असतानाच मनात मोठे स्वप्न असल्याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे त्याने ठरविले. एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशिल गावात गट्टा (जोबिया) येथे कार्य बजावत असताना अनेक कठिण प्रसंगाला तोंड द्यावे लागले. या गावात कोणतेही वृत्तपत्र येत नव्हते, वाचनालयही नव्हते, शिकवणी वर्ग नाही, ध्येय गाठण्याच्या उद्देशाने राजेश उंदीरवाडे हा अभ्यासाला लागला व २०१६ साली झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकांच्या पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत अनुसुचित जातीच्या १०९ जागांपैकी ५० व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. खडतर मार्गाने जीवन व्यतीत करीत असताना मोठे स्वप्न बाळगल्याचा फायदा राजेशला झाला. त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अजय गरीबीवर मात करून पोलीस उपनिरीक्षक झाला. दिघोरीत त्याचे कौतुक होत आहे. राजेशने यशाचे श्रेय आई-वडील, बहिण व मित्रांना दिले आहे.