डॉक्टरच्या निष्काळजीमुळे नवजात बाळाचा मृत्यू
By Admin | Updated: November 13, 2014 22:56 IST2014-11-13T22:56:29+5:302014-11-13T22:56:29+5:30
नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सामान्य प्रसुती होणार असल्याचे सांगून एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टरने त्या रुग्णाला प्रसूतीसाठी वाट पाहण्यासाठी सांगितले. परंतु महिलेच्या वेदना

डॉक्टरच्या निष्काळजीमुळे नवजात बाळाचा मृत्यू
भंडारा येथील घटना : भोंगाडे कुटुंबीयांची कारवाईची मागणी
भंडारा : नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सामान्य प्रसुती होणार असल्याचे सांगून एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टरने त्या रुग्णाला प्रसूतीसाठी वाट पाहण्यासाठी सांगितले. परंतु महिलेच्या वेदना लक्षात घेता तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तिथे शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली असता बाळ मृत जन्माला आले. वेळीच शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केल्यामुळे महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सदर घटना बुधवारच्या रात्री घडली.
गणेशपूर येथील रहिवाशी अलका भोंगाडे यांची मागील नऊ महिन्यांपासून नियमित तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.दीप्ती डोकरीमारे यांच्याकडे सुरू होती. डॉ.दीप्ती डोकरीमारे या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. साई मंदिर मार्गावर त्यांचे खासगी रुग्णालय आहे. मागील आठवड्यात ५ नोव्हेंबर रोजी बाळाची हालचाल सुरु नसल्याचे लक्षात येताच भोंगाडे यांनी डॉ.डोकरीमारे यांचे रुग्णालय गाठले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चिंतेचे कारण नसल्याचे सांगून सर्व ठीक असल्याचे सांगितले. परंतु अलकाचा त्रास मात्र कमी झाला नाही.
त्यामुळे भोंगाडे कुटुंबियांनी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉक्टरांनी नाळ बाळाच्या गळ्याभोवती आवळली असल्याचे सांगून शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्याचा सल्ला दिला. परंतु, डॉ.डोकरीमारे यांच्यावर विश्वास असल्यामुळे भोंगाडे कुटुंबिय पुन्हा त्यांच्याकडे गेले. त्यावेळीही डोकरीमारे यांनी सर्व नॉर्मल असल्याचे सांगून शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगितले. परंतु, ज्यावेळी त्रास वाढला तेव्हा डॉ.डोकरीमारे यांच्या रुग्णालयात गेले असता त्यांनी तपासणी केली. आता बाळाचे ठोके कमी झाले आहेत, परंतु सर्व सामान्य आहे, असे सांगितले. रात्री ९ च्या सुमारास अलकाला प्रसुती वेदना सुरु होताच पुन्हा डॉ.डोकरीमारे यांच्या रुग्णालयात नेले असता सोनोग्राफी करुन आणण्यासाठी सांगितले. सोनोग्राफी न पाहता काही करता येणार नाही, असे सांगून प्रसुती करण्यासाठी नकार दिला. भोंगाडे कुटुंबियांनी अलकाला सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले. तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे त्यांची वाट पाहण्यात तासाभराचा वेळ गेला.
वेदना वाढत असल्यामुळे त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. तिथे रात्री १२.३० वाजता शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. जन्माला आलेले बाळ मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाचा तीन दिवसांपूर्वीच पोटात मृत्यु झाला होता. गर्भवतीला रुग्णालयात आणण्यासाठी थोडासाही विलंब झाला असता तर मातेलाही धोका होण्याची शक्यता होती, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर पिडीत भोंगाडे कुटुंबियांनी संताप व्यक्त करीत या घटनेला जबाबदार असलेल्या डॉ.डोकरीमारे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)