सौंदड खापरी पुनर्वसनाकडे शासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 2, 2016 00:33 IST2016-07-02T00:33:43+5:302016-07-02T00:33:43+5:30
गोसे प्रकल्पाच्या नवीन पुनर्वसन सौंदड खापरी गावठाणात विविध समस्याचा अभाव असल्याने प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत.

सौंदड खापरी पुनर्वसनाकडे शासनाचे दुर्लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराचा टोपली : रस्ता रोको आंदोलनाची तयारी
प्रकाश हातेल चिचाळ
गोसे प्रकल्पाच्या नवीन पुनर्वसन सौंदड खापरी गावठाणात विविध समस्याचा अभाव असल्याने प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत. गावाचे पुनर्वसन करताना भौतिक सुविधा देण्याची आश्वासने देण्यात आले होते. परंतु अद्यापही अठरा नागरी सुविधाची पुर्तता शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातले. जिल्हाधिकारी यांनी गोसे पुनर्वसन अधिकाऱ्यांना नोटीस देवून समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. सदर समस्या १५ दिवसात मार्गी न लागल्यास प्रकल्पग्रस्त राज्य मार्ग भंडारा-पवनी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशरा पुनर्वसन वासीयांनी दिला आहे.
खापरी, सौंदड पुनर्वसन संदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधी व शासनाला लेखी निवेदने, आंदोलने करूनही शासन कानाडोळा करीत आहे. पुनर्वसनात अद्यापही १८ नागरी सुविधांची पुर्तता केली नाही. कुणाला भुखंड मिळाले तर, कुणाला भुखंडच मिळाले नाही. कुणाला आर्थिक पॅकेज मिळाला नाही तर, कुणाला मोबदला मिळाला, कुणाला भुखंड मिळाला नाही तर कुणाला काहीच मिळाले नाही. ज्या गावकऱ्यांचे १५ ते २० वर्षापासून गावात वास्तव्य असून अशा व्यक्तींना कोणताच मोबदला मिळाला नाही. पुनर्वसनस्थळी पाणी समस्या, जमीन दोस्त झालेली नाही, अरूंद नाली बांधकाम, गुरे चराई जागा, दहन भूमी उखडलेले रस्ते, विद्युत समस्या, बस थांबा अशा एक ना अनेक समस्यांचा सामना प्रकल्पग्रस्तांना करावा लागत आहे. प्रकल्पबाधीत व पुनर्वसीत १८ नागरी सुविधा अपूर्ण असताना शासनाने १०० टक्के पुनर्वसन झाल्याचे पत्रान्वये घोषणा देवून प्रकल्पग्रस्तावर दबाव आणण्याचा डाव आहे, असा आरोप माजी सरपंच राजहंस भुते व विजय निंबार्ते यांनी केला आहे.
सौंदड या बाधीत गावात ज्यांना भुखंड नाही मिळाले ते अजुनही ६५ कुटूंब वास्तव्य करीत आहेत. शासनाने अद्यापही त्यांना भूखंड दिले नाही तर, सौंदड गट ग्रामपंचायत मधील सुरबोडी गावाचे ८५ टक्के शेती बाधीत असून या गावाचा अद्यापही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्रस्त प्रकल्पग्रस्तांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कारच टाकला. मात्र दोन महिने लोटूनही शासन कोणत्याच प्रकारचा पवित्रा घेत नाही किंवा लोकप्रतिनिधी साधे गावाला भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. सद्या पावसाळ्याचे दिवस असून गावठानावर प्रशासनाचे राज्य आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने १० दिवसांपासून पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसला आहे. समस्या लोकप्रतिनिधींना माहित असूनही लोकप्रतिनिधी गावाला भेट देत नाही. येत्या १५ दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी न लागल्यास संपूर्ण प्रकल्पग्रस्त भंडारा-पवनी मार्गावर सौंदड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय निंबार्ते, प्रदीप गजभिये आदी प्रकल्पग्रस्तांना दिला आहे.
लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे करूनही कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जाग येत नसल्याने येत्या १५ दिवसात रस्ता रोको आंदोलन संपूर्ण महिला-पुरूषासह करणारच.
-राजहंस भुते, माजी सरपंच सौंदड.
पूनर्वसन गावठाणातील १८ नागरी सुविधांची शिल्लक कामे शासन पत्रान्वये जिल्हा परिषदे मार्फत होणार आहेत.
-अ.भा. खडसे, मुख्य अभियंता पुनर्वसन गोसे.