संताचे विचार काळाची गरज

By Admin | Updated: February 7, 2015 23:18 IST2015-02-07T23:18:32+5:302015-02-07T23:18:32+5:30

जीवनाचा मुख्य उद्देश ज्ञानप्राप्ती असून संताच्या विचारानेच संस्कार जोपासले जातात. ईश्वराने मला भरभरून दिले. मला जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांची चिंता आहे.

The need of the saints is the need of the hour | संताचे विचार काळाची गरज

संताचे विचार काळाची गरज

तुमसर : जीवनाचा मुख्य उद्देश ज्ञानप्राप्ती असून संताच्या विचारानेच संस्कार जोपासले जातात. ईश्वराने मला भरभरून दिले. मला जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांची चिंता आहे. त्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावे याकरिता मी संताकडे मागणी मागतो, असे भावनिक उद्गार राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काढले.
परसवाडा (दे.) येथे गुरूदेव धाम मानव कल्याण आश्रमात आयोजित नि:शुल्क सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती केशवराव निर्वाण भंडारा, नाना पंचबुद्धे, मधुकर सांबारे, नारायणराव तितीरमारे, प्रमोद तितिरमारे, विठ्ठलराव कहालकर, राजू माटे, देवसिंग सव्वालाखे, देवचंद ठाकरे, मनोज वासनिक, चंदू तुरकर उपस्थित होते.
प्रफुल पटेल पुढे म्हणाले संत तुकडोजी महाराज व माझे वडील मनोहरभाई पटेल यांचे स्रेहाचे संबंध होते. ते त्यांचे पहिले भक्त बनले होते. वडिलांच्या सामाजिक कार्याचा मी वसा घेतला असून सामाजिक बदल घडणे अत्यंत गरजेचे आहे. सत्तेच्या मागे मी धावत नाही तर प्रेम व सेवेकरिताच मी धावतो. दिल्लीत २५ वर्षे सतत मी आहे. संसदेत ५५० खासदार आहेत. स्वत:ची ताकत निर्माण करण्याचे रहस्य फार थोड्या लोकांत असते. विकासाची भूक मला लागली होती. म्हणूनच बावनथडी, गोसेखुर्द, सोंड्याटोला, धापेवाडासारखे प्रकल्प पूर्ण केले. येणाऱ्या काळात शिक्षणाच्या सोयीसुविधा येथे पूर्ण करण्याची गरज आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध झाली. नवदाम्पत्यांना आश्रमातर्फे कपडे व पाच भांडी भेट देण्यात आली. विवाह समारंभ हा नि:शुल्क होता. एक रूपयाची वर्गणी घेवून हा देखणा आश्रम तयार झाला, असे आश्रमाचे संस्थापक नानाजी कांबळे महाराज यांनी सांगितले.
लक्ष्मणराव काळे महाराजांच्या किर्तनाने परसवाडा हे गाव भक्तीमय सागरात बुडाले होते. हजारोंची गर्दी याप्रसंगी येथे झाली होती. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश गायधने गुरूजी, प्रास्ताविक आश्रमाचे अध्यक्ष गजानन बुरडे नागपुर तर आभार आश्रमाचे संस्थापक नानाजी कांबळे महाराज यांनी मानले. आश्रमात तीन दिवसापासून भजन किर्तन सुरू होते. लग्न वऱ्हाडी येथे आल्याने गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: The need of the saints is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.