विकासासाठी प्रामाणिकतेची गरज
By Admin | Updated: January 28, 2016 00:30 IST2016-01-28T00:30:40+5:302016-01-28T00:30:40+5:30
जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे.

विकासासाठी प्रामाणिकतेची गरज
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादन : प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रम
भंडारा : जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी सुद्धा विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन अमूल्य योगदान द्यावे, जिल्ह्याची प्रगती आणि विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक विनिता साहू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी, लोकशाही प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राने कायम आपले योगदान दिले. पुरोमागी विचारसरणीच्या महाराष्ट्राने देशाला अनेक लोकाभीमुख कायदे दिले. पारदर्शक व गतीमान प्रशासनासाठी शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बँड पथक आणि एन.सी.सी., स्काऊड गाईड पथकाने पथसंचलन केले. दरम्यान शहरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विविधारंगी कार्यक्रम सादर केले. रॉयल पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तीपर गीतांची धून वाजवून सर्वांचे मने जिंकले. नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. रस्ता सुरक्षा संबंधी चित्ररथाचे संचलन व पंचायत समिती, संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्याच्या चित्ररथाचे आयोजन केले होते. अंकुर विद्यामंदिरच्या चिमुकल्यांनी कब बुलबुल पथकाने सादर केलेले पथसंचलन विशेष आकर्षण ठरले. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात साकोली तालुक्यातील बिरसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विजया राऊत यांना सन २०१५ चा राष्ट्रीय फेलोरेंस नायंटीगेल पुरस्कार दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यासाठी त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय कौशल्य स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अंकुश नंदनवार, स्वयंरोजगार क्षेत्रातील कार्याबद्दल बासोऱ्याचे प्रदीप रामटेके, लाखनीचे सुमेध मेश्राम, भंडाऱ्याचे दुर्गेश रगडे, बाम्हणीच्या शुद्धशिला दहिवले व गणेशपूरचे कृष्णा खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला. स्काऊट गाईड चळवळीत पवनी विद्यालय पवनी, नवप्रभात हायस्कुल कोथुर्णा, जि. प. हायस्कुल, वरठी, शारदा विद्यालय तुमसर, जि. प. हायस्कुल मोहाडी या शाळांना राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ध्वजनिधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे, उत्कृष्ट तलवारबाज म्हणून सौरभ तोमर, आट्यापाट्या खेळात दिपाली शहारे, हँडबॉल क्रीडा मार्गदर्शक हेमंत धुमनखेडे, उत्कृष्ट क्रीडा संघटक अरुण बांडेबुचे यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)