पाण्याच्या बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची गरज
By Admin | Updated: November 1, 2014 22:47 IST2014-11-01T22:47:35+5:302014-11-01T22:47:35+5:30
कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.

पाण्याच्या बचतीसाठी नळांना तोट्या बसविण्याची गरज
भंडारा : कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. सार्वजनिक नळाला तोट्या बसविल्यास दररोज ७ हजार लिटर्स पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे मूल्य जाणून बचत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
भंडारा शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. शहराला पाणी पुरवठा जुन्या टाकीतुन होत असुन तिची क्षमता ६० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याची आहे. शहरातील ५० टक्के नागरिकांकडे नळजोडणी आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास दररोज १५ दशलक्ष लिटरची पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या क्षमतेअभावी सर्व नळ जोडणीधारकांना दोन वेळेला नऊ दशलक्ष लिटर्स पिण्याचे पाणी एका दिवसाला पुरवठा करण्यात येत आहे. शहर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहरात घरगुती १२ हजार नळ जोडणी असून ३०० जोडणी सार्वजनिक आहेत.
सुमारे ५० वर्षापासून जोडण्यात आलेल्या जलवाहिनीतुन पालिका प्रशासन शहरातील नळ जोडणीधारकांना पाण्याचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या जलवाहिन्या अनेक ठिकाणाहून जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात लिकेज होतात. लिकेजमुळे अनेकदा शहरातील पाणी पुरवठा कित्येकदा बंद राहतो. जुन्या फिल्टर प्लँटची क्षमता कमी असल्याने शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा करताना पालिका प्रशासनाची कसरत होत आहे.
मुख्य जलवाहिनीवर असलेल्या नळ जोडणीस तोट्या लावणे आवश्यक असते. परंतु, तोट्या नसल्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होतो. शिवाय, रस्त्यावर आणि प्रांगणात सडा टाकून पाणी वाया घालविले जाते. यात हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होते. आवश्यक पाणी घेऊन नळाच्या तोट्या बंद कराव्यात. त्यामुळे मोठ्या दाबाने खालच्या नागरिकांपर्यंत नियमानुसार पाणी मिळेल. परंतु, असे होत नाही.
पिण्याचे पाणी भरल्यानंतरही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पाणी बचतीविषयी विचार केला तर शहरातील सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्यात आल्यास तब्बल सात हजार लिटर्स पाण्याची दररोज बचत होऊ शकते. पालिकेकडून पाणी सोडल्यानंतर तोट्या नसल्याने आणि गळतीमधून पाणी वाया जात आहे. (शहर प्रतिनिधी)