कोलकत्ताच्या मंदिरात ‘तापदा’ मासाचा नैवेद्य
By Admin | Updated: May 17, 2014 23:30 IST2014-05-17T23:30:17+5:302014-05-17T23:30:17+5:30
नऊ कोटी बंगाली बांधवांची आराध्य दैवत कालीघाट मंदिरातील कालीमातेला दिला जाणारा नैवेद्य म्हणून पूजेच्या थालीत दुर्मिळ ‘तापदा’ नावाचा मासा

कोलकत्ताच्या मंदिरात ‘तापदा’ मासाचा नैवेद्य
मोहन भोयर-तुमसर
नऊ कोटी बंगाली बांधवांची आराध्य दैवत कालीघाट मंदिरातील कालीमातेला दिला जाणारा नैवेद्य म्हणून पूजेच्या थालीत दुर्मिळ ‘तापदा’ नावाचा मासा तुमसर तालुक्यातील चांदपूर जलाशयातून आठवड्यातून एकदा डबाबंद पार्सलद्वारे पाठविण्यात येतो. सध्या हे मासे केवळ १० ते १५ किलोग्रॅमच शिल्लक असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भंडारा जिल्ह्यात क्रमांक दोनचा मोठा जलाशयात तुमसर तालुक्यातील चांदपूर जलाशयाचा समावेश होतो. सध्या हा तलाव चर्चेत व प्रसिद्धीस आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. नऊ कोटी बंगाली बांधवांची आराध्य दैवत कोलकत्ता येथील कालीघाट येथे स्थित कालीमाता असून या मंदिरात दररोज लाखो भावीक देश विदेशातून येतात. विशेषत: बंगाली बांधव या कालीमातेला पूजेच्या थालीत ‘तापदा’ नावाचे मासे नैवेद्य म्हणून देतात. हा मासा अत्यंत शुभ समजला जातो. असा हा दुर्मिळ व महागडा मासा तुमसर तालुक्यातील चांदपूर जलाशयात आठ ते दहा वर्षापूर्वी पाहुणा म्हणून अनावधानानेच आला होता. येथील गोडे पाणी विस्तीर्ण जलाशयात तसे पोषक वातावरण मिळाल्यानेच तो टिकला. आता दर आठवड्याला येथून हवाबंद डब्यातून कोलकत्ताला येथील मत्स्यसंस्था नित्यनियमाने पाठवित आहे. कसा आला दुर्मिळ ‘तापदा’ मत्स्य बिजाची भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी येथील मत्स्य संस्थेने कोलकत्तातून चांदपूर जलाशयाकरीता मत्स्यबीज आणले होते. त्या मत्स्य बिजासोबत अनावधानाने हा दुर्मिळ तापदा चांदपूर जलाशयात दाखल झाला. दिसायला अरबी समुद्रातील पॉपलेट माशासारखा हा दिसतो. पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशात या तापदाला मोठी मागणी आहे. पॉपलेट माशासारखा हा महागडा असून प्रतिकिलो ८०० ते १ हजार अशी किंमत आहे. सध्यास्थितीत चांदपूर जलाशयात तापदा मासे केवळ १० ते १५ किलोग्रॅमच शिल्लक राहिले आहेत. या माशांचा वजन केवळ ८०० ते १ किलोग्रॅम इतके होते. सुरुवातीला कधी न पाहिलेला तापदा मासा कोळी बांधवांनी पकडला तेव्हा अतिशय कुतुुहल त्यांना वाटले. चापट रंगाचा हा मासा दिसायला अतिशय सुंदर आहे. काही कोळी बांधवांनी सुरुवातीला त्याला भीत भीत खाल्ले तेव्हा त्यांना आपण आपल्या जीवनात इतका रुचकर मासा खाल्लाच नाही अशी प्रतिक्रिया येथील कोळी बांधवांनी लोकमतजवळ व्यक्त केली. जगप्रसिद्ध कालीघाट येथील ‘तापदा’ मासा नैवेद्य म्हणून जाणे हे आमचे भाग्यच आहे असे कोळी बांधवांनी सांगितले.