राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेचा काही भाग लिहिला तुमसरात
By Admin | Updated: June 3, 2016 00:35 IST2016-06-03T00:35:04+5:302016-06-03T00:35:04+5:30
ग्रामगीता मानवधर्माचा ग्रंथ असून त्यातील काही भाग ग्रामगीतेचे निर्माते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमसरात लिहिल्याची माहिती

राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेचा काही भाग लिहिला तुमसरात
सव्वा एकरात गायधने यांचे आश्रम : वयोवृद्ध यादवराव गायधने यांची माहिती
मोहन भोयर तुमसर
ग्रामगीता मानवधर्माचा ग्रंथ असून त्यातील काही भाग ग्रामगीतेचे निर्माते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमसरात लिहिल्याची माहिती मानवधर्म आरोग्य शिक्षण आश्रमाचे प्रमुख तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी ८४ वर्षीय यादवराव माधवराव गायधने यांनी ‘लोकमत’शी अनौपचारीक चर्चेदरम्यान सांगितली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुमसरात आले होते. त्यावेळी ग्रामगीतेचा काही भाग त्यांनी तुमसरात लिहिला. खेड्यातील सामान्यांचे जीवन, रोजगार, अंधश्रद्धा निर्मूलन, लग्नपद्धती, शिक्षण पद्धती, मानवधर्म, सामूदायीक प्रार्थना यांची माहिती सर्वसामान्यांत राहून कशी मिळवावी यात महाराजांचा हातखंडा होता. तुमसर शहरातील श्रीमंतीबद्दल ते बोलले. सामूदायीक प्रार्थना करावी असा त्यांनी उपदेश केला होता.
सार्वजनिक जीवनात सक्रीय असणारे यादोराव गायधने यांनी हे गुपीत उलगडले. १९६५ मध्ये तुकडोजी महाराज तुमसरात आले होते. तेव्हा त्यांनीच तुमसरचा उल्लेख केला होता. यादवरावांचा जन्म १९३२ मध्ये झाला. बी.कॉम. पर्यंत शिक्षण झाले. ते सध्या ८४ वर्षांचे आहेत. शरीर थकल्यासारखे असले तरी त्यांचा करारीबाणा आजही बोलण्यातून दिसून येतो.
समाजकार्याला वाहून घेतलेले यादोराव अविवाहित आहेत. सव्वाचार एकर शेतीपैकी त्यांनी सव्वातीन एकर शेती विकली. सव्वा एकरात तुमसर- भंडारा मार्गावर यादवराव गायधने आरोग्य संरक्षण परिसर त्यांनी बांधला. येथे झाडे, गणेश विसर्जन, गौरी विसर्जन स्थळ तयार केले. लहान सभामंडप, लहान स्टेज तयार केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असून दररोज येथे सामूदायीक प्रार्थना होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडल्याने त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. कृषी मालाला योग्य भाव मिळावा म्हणून यादवराव यांनी मोठे आंदोलन केल होते. त्यास तुकडोजी महाराजांनी कौतूक केले होते. उत्पन्न व खर्च यांची सांगड घातल्यावर शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. शासनाला तो आराखडा १९७२ मध्येच दिला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सद्धर्म, आचार, प्राबल्य, संघटन शक्ती, ग्रामरक्षण, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार, जीवन शिक्षण, महिला शक्ती, संस्कार, ग्रंथ अध्ययन, ग्रंथ महिमा, भजन, अवतार कार्य व प्रारब्ध याबद्दल तुमसरात प्रबोधन केले होते. तुमसरच्या मातीत तेज असून स्वातंत्र्याकरिता लढा देणारे शूरविरांची धरती आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढल्याचे त्यांनी सांगितले.