जेवनाळा : राज्याच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नावात बदल करण्यात येणार आहे. यात भंडारा जिल्ह्यातील एकूण सात पैकी भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी व लाखांदूर या पाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण होणार आहे.
युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे, या हेतूने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कौशल्य, रोजगार, विभागाच्या वतीने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करण्यात येणार आहे.
असे होणार संस्थांच्या नावात बदल भंडारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव यापुढे रामभाऊ अस्वले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा, लाखांदूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव यापुढे नामदेवराव दिवटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखांदूर, मोहाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव यापुढे परमवीर चक्र विजेता मेजर ध्यानसिंह थापा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी, पवनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस महासती बेनाबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी असे नामकरण होणार आहे.
तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावात सम्राट पृथ्वीराज चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर, असा बदल होणार आहे. नव्या बदलामुळे शासकीय औद्योगिक संस्थांचे जुने नाव बदलून नवी ओळख मिळणार आहे. नव्या नावाने या संस्था जिल्ह्यात ओळखल्या जाणार आहेत.