आवास योजना यादीत मृतांची नावे

By Admin | Updated: May 4, 2017 00:27 IST2017-05-04T00:27:14+5:302017-05-04T00:27:14+5:30

लाखनी तालुक्यातील दिघोरी (नान्होरी) ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योनजेच्या लाभासाठी यादी तयार केली.

Name of the deceased in the housing scheme list | आवास योजना यादीत मृतांची नावे

आवास योजना यादीत मृतांची नावे

भंडारा : लाखनी तालुक्यातील दिघोरी (नान्होरी) ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योनजेच्या लाभासाठी यादी तयार केली. मात्र, यात पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्रांची नावे समाविष्ट केली आहे. यासोबतच यादीत मृतकांची नावे असल्याचा आरोप दिघोरी ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतरही दोषींना अभय देण्यात येत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दिघोरी (नान्होरी) ग्रामपंचायतीने सन २०११ मध्ये सामाजिक, आर्थिक व जाती निहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. यात निकषानुसार २४६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यात ओबीसी ९९, अनुसूचित जातीचे ४५ तर अनुसूचित जमातीचे पाच असे १४९ लाभार्थ्यांना पात्र दाखवून उर्वरित ९७ लाभार्थ्यांना वगळण्यात आले. ही यादी २०१५ मध्ये प्रकाशित केली. या यादीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची तयार करण्यात आलेल्या यादीत घोळ करण्यात आलेला आहे. ज्या गरजूंना घरांची आवश्यकता आहे, अशांना यातून वगळण्यात आलेले आहे. तर मृत व्यक्तींचे नावे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करून ग्रामपंचायत प्रशासनाने कळस गाठला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, खंडविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांना तक्रार केली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत सचिव एच. पी. हुमने, सरपंच अरूण जांभूळकर यांनी हेराफेरी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामसभेतून लाभार्थी निवडीची प्रक्रिया पार पाडावी लागते. मात्र, सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी मर्जीतील नागरिकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी शासकीय नियम बाजू सारले. ग्रामसभा न घेता व अन्य ग्रामपंचायत सदस्यांना यादी बाबत कल्पना न देता नवीन लाभार्थी यादी तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीतून केला आहे. १५ आॅगस्ट २०१६ च्या नियोजीत ग्रामसभेमध्ये उपस्थितांचा कोरम पूर्ण झाला असतानाही, प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय नोटीस बुकावर घेण्यात आला. परंतू घरकुल लाभार्थी यादी तयार करण्याविषयी चर्चा न करताच परस्पर ही यादी तयार करण्यात आली. ही बाब २० फेब्रुवारीला ग्रामस्थांच्या लक्षात आली. याबाबतीत २८ फेब्रुवारीला लाखनी येथील खासदार नाना पटोले यांच्या जनता दरबारात याविषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान याप्रकरणाची चौकशी पंचायत समिती लाखनीचे शाखा अभियंता धनंजय बागडे व विस्तार अधिकारी नागलवाडे यांनी केली. यात पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याची नोंद करण्यात आली असून तसा अहवाल पंचायत समितीला पाठविला असल्याचे समजते. चौकशीनंतरही दोषी सचिव, सरपंच यांच्यासह अन्य व्यक्तींवर कार्यवाही होणे गरजेचे असताना त्यांची पाठराखण करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १५ दिवसात दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

मृत व गाव सोडणाऱ्यांचा समावेश
दिघोरी ग्रामपंचायतीने तयार केलेली यादी ही दिशाभूल करणारी आहे. या यादीत गावातील गौराबाई जांभूळकर, यादो खोब्रागडे व हरिश्चंद्र बडोले या मृतकांचे नाव आहे. तर टेकराम जांभूळकर हे मागील १० ते १५ वर्षांपासून गावात राहत नसतानाही त्यांचेही नाव यादीत समाविष्ठ करण्यात आलेले आहे. बालक खोब्रागडे यांना यापूर्वी घरकुलचा लाभ मिळालेला आहे. सध्या त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य असतानाही त्यांचे नाव आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आलेले आहे.
या ग्रामस्थांना यादीतून वगळले
दिघोरी येथील अनेक ग्रामस्थांची घरे आजही मातीची व पडकी घरे आहेत. अशा ग्रामस्थांची घरे पक्के असल्याची खोटी नोंद करून त्यांना यादीतून वगळले आहे. यासोबतच अनेक कुटुंबांना स्वत:ची घरे नसतानाही त्यांना घर असल्याची नोंद करून योजनेपासून वंचित ठेवले आहे. अनेकांनी कुटुंबापासून वेगळा संसार थाटला असतानाही त्यांची संयुक्त कुटुंबात नोंद दाखविल्याने अशांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

लाभार्थी यादीबाबत पंचायत समिती या प्रकरणाचा उलगडा करेल. चौकशीला सामोरे जावू.
- एच. पी. हुमणे
ग्रामसेवक, दिघोरी (नान्होरी).

Web Title: Name of the deceased in the housing scheme list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.