Namala Education Department after the agitation | आंदोलनानंतर नमला शिक्षण विभाग
आंदोलनानंतर नमला शिक्षण विभाग

ठळक मुद्देपालकांनी ठोकले कुलूप : गुंथारा येथे जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक रूजू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथे शिक्षिकेच्या कार्यप्रणालीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी मंगळवारी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. आंदोलनाला तासभर होत नाही तोच शिक्षण विभागाने एकाची शिक्षकाची नियुक्ती केली. त्यांनतर या आंदोलनाची सांगता झाली. अखेर गावकऱ्यांपुढे शिक्षण विभाग नमले.
भंडारा तालुक्यातील व धारगांव केंद्रांतर्गत असलेल्या गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथील सहाय्यक शिक्षिका निखाडे यांची प्रकृती वर्षभरापासून ठिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार पालकांनी केली होती. तसा अर्जसुध्दा शाळा व्यवस्थापन समितीकडून वरिष्ठांना देण्यात आला होता. यासह सहाय्यक शिक्षिका निखाडे यांनी स्वत: वरिष्ठांना अर्ज करुन विद्यार्जन करताना त्रास होत असल्याचे कळविले होते. परंतु कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हीती. अखेर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
यावेळी पंचायत समिती सदस्य टेकराम पडोळे, सरपंच शुभांगी सार्वे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोविंदा सार्वे, पोलीस पाटील नरेंद्र सार्वे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजू सय्याम, राजू सूर्यवंशी, सविता नागदेवे, माजी उपसरपंच उमेश सार्वे, आनंद भोयर, रामाजी झंझाळ, निशा कांबळे, वैशाली कोराम, सतीश जगनाडे, सुनील बोरकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारासमोर चटई टाकून विद्यार्थ्यांना बसविले होते. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेसमोर उपस्थितांचे मार्गदर्शन सुरु असताना तासभरात नवनियुक्त शिक्षक तिथे पोहचले. त्यांची परिचय देत या शाळेत नवीन शिक्षक म्हणून आल्याचे सांगितले. प्रशासनाने नवीन शिक्षकाला गुंथारा येथील शाळेत रूजु होण्यास पाठविल्याने पंचायत समिती सदस्य टेकराम पडोळे यांनी शाळेचे कुलूप उघडले. नेहमी प्रमाणे शाळा भरल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या नवीन शिक्षकांचे शाळा व्यवस्थापण समिती, पालक वर्ग व ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले. नवीन शिक्षकांची नियुक्ती होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून आता शाळेत चार शिक्षक कार्यरत आहेत.

गावकऱ्यांचा अल्टिमेटम
वर्ष होऊनही शिक्षकांच्या नियुक्तीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा करीत होते. त्यामुळे सहाय्यक शिक्षिका निखाडे यांना शाळेत जावे लागत असे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याची दखल घेत पालकांनी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले. निवेदनात १९ नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला. मात्र मागणीची पुर्तता झाली नाही. मंगळवारी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्याम सार्वे यांच्या नेतृत्वात शाळेला कुलूप ठोकण्यात आले.

Web Title: Namala Education Department after the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.