जाहिरात फलकांसाठी वृक्षांना ठोकले जातात खिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:35+5:302021-04-02T04:36:35+5:30
शहरात झाडांच्या खोडावर पोस्टर, फलक, रोषणाईच्या माळा असतात. झाडांच्या आधारे उभ्या राहणाऱ्या दुकानांच्या वायरी झाडांवर लटकलेल्या असतात. ...

जाहिरात फलकांसाठी वृक्षांना ठोकले जातात खिळे
शहरात झाडांच्या खोडावर पोस्टर, फलक, रोषणाईच्या माळा असतात. झाडांच्या आधारे उभ्या राहणाऱ्या दुकानांच्या वायरी झाडांवर लटकलेल्या असतात. जाहिरात बाजीसाठी झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. परंतु झाडांनाही वेदना होतात याचा विचार कुणीच करत नाही. थोर शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात झाडांनादेखील संवेदना असतात हे स्पष्ट करुन दाखविले आहे. नागरिकांकडून कळत नकळत होणारी ही कृती झाडांना हानीकारक ठरत आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम, झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम आणि राष्ट्रीय हरित लवाद यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे स्पष्टपणे अधोरेखित आहेत. तरी लोक बेजबाबदारपणे वागून झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावल्याचे दिसतात. झाडांना ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात, तो गंज झाडांच्या खोडात उतरतो. परिणामी झाडे खंगत जातात. त्यांचे आयुष्य कमी होते, भंडारा शहरात जाहिरात फलक व व्यवसायाची माहिती देण्याचा हा गैरप्रकार केला जात आहे.
खिळेमुक्त झाडे अभियान
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असाच प्रकार दिसून येत आहे. मागील वर्षापर्यंत निसर्गप्रेमींनी झाडांना होणारी इजा व वेदना लक्षात घेता पर्यावरणप्रेमी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू झाली. या मोहिमेतमंगला डहाके, मंदा चेटुले, आशिष भुरे, नेमाजी करकाडे, जाधवराव साठवणे, स्वाती सेलोकर, हेमंत धुमनखेडे, घरोटे, पूनम डहाके, माला बगमारे, सुनील थोटे, विशाल तायडे व आंघोळीची गोळी, खुशी बहुउद्देशीय फाउंडेशन, वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटना, युवा जनकल्याण यांनी खिळेमुक्त झाडे अभियान राबवून झाडांना जीवदान दिले.