चार वर्षानंतरही ‘जय’चे बेपत्ता होण्याचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:46+5:30

पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला.

The mystery of Jay's disappearance persists even after four years | चार वर्षानंतरही ‘जय’चे बेपत्ता होण्याचे गूढ कायम

चार वर्षानंतरही ‘जय’चे बेपत्ता होण्याचे गूढ कायम

Next
ठळक मुद्देपवनी-कºहांडला अभयारण्य : आशियाचा आयकॉन ठरलेल्या वाघ १८ एप्रिल २०१६ पासून झाला बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा भारतातील क्रमांक दोनचा वाघ आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होवून आता चार वर्ष झाली आहेत. परंतु वन्यप्रेमी, पर्यटक आणि सामान्य जनतेला जयचा विसर पडला नाही. रूबाबदार आणि देखणा जय वाघ बेपत्ता होण्याचे गुढ अद्याप कायम असून वनविभाग, गुप्तचर विभाग आणि राज्य सरकारलाही त्याचा शोध घेता आला नाही. आता उरल्या केवळ जय वाघाच्या आठवणी आणि सुरस कथा.
पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला. त्यानंतर या जंगलाचा समावेश उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय या अभयारण्याचा हीरो ठरला. शेकडो पर्यटक जयची एक झलक पाहण्यासाठी येथे येत होते. आॅनलाईन बुकींगही मिळत नव्हते. अनेक जणांना येथे प्रतीक्षेत राहत होते. भारदस्त शरीरयस्टी, देखणेपणा, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाईमुळे त्याने पर्यटकांना भुरळ घातली. या जंगलावर त्याने आपले अधीराज्य निर्माण केले. अनेक वाघांना येथून पळवून लावले. एवढा दरारा जयचा होता. त्याच्यापासून जवळपास २४ छाव्यांना वाघीनींनी जन्म दिला. जय कुणाला घाबरत नव्हता. परंतु त्याने माणसावर कधी हल्ला केला नाही.
जून २०१६ मध्ये जय अचानक बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येवू लागली. सुरूवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची माहिती वनविभागाला द्यावी लागली. अचानक बेपत्ता झालेला जय शेवटच्या कालावधीत पवनीजवळील बेरावा शिवारात आढळला होता. जयला लावलेल्या आयडीकॉलरची ही अखेरची नोंद ठरली. परंतु नंतर तो कुठे गेला, काय गेला याचा थांगपत्ता लागला नाही.

मिशन जय सर्च मोहीम अपयशी
वनविभागाने मिशन जय सर्च मोहिमेवर आपले सर्व लक्ष केंद्रीत केले होते. जयचे १८ एप्रिल २०१६ रोजी शेवटचे लोकेशन आढळून आले. विशेष म्हणजे जय आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात जयच्या पायाचे ठसे आढळून आले, तेथून केवळ २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिलला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातून डोंगरमहादेव परिसरातील जंगलात शेंड्यापिपरी नावाच्या बोडीत डुंबताना पर्यटकांना दिसला होता. त्यानंतर जय कधीच कुणाला आढळला नाही. आता केवळ जयच्या आठवणी उरल्या आहेत. जयची शोध मोहीम वनविभागाने का थांबविली, याचा विचार करण्याचीही गरज आहे.

Web Title: The mystery of Jay's disappearance persists even after four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ