माझ्या मुलाचा खूनच
By Admin | Updated: January 24, 2015 00:19 IST2015-01-24T00:19:34+5:302015-01-24T00:19:34+5:30
माझ्या मुलाचा खून करून त्याला आत्महत्येचे रूप देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानी या प्रकरणाची योग्य चौकशी केली नाही.

माझ्या मुलाचा खूनच
साकोली : माझ्या मुलाचा खून करून त्याला आत्महत्येचे रूप देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानी या प्रकरणाची योग्य चौकशी केली नाही. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी व हत्या करणाऱ्या आरोपीविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मी २८ पासून पोलीस स्टेशन साकोलीसमोर आमरण उपोषण करीन, असे निवेदन मृतकाचे वडील पांडूरंग निखारे (५९) रा. सुकळी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली मार्फत दिले आहे.
माझा मुलगा रामचंद्र उर्फ शेखर निखारे (२५) हा १७ डिसेंबर २०१४ ला नागपूर येथे जातो म्हणून निघाला. त्यानंतर त्याचा फोन आला नाही व आम्ही फोन लावला असता फोन लागला नाही. त्यानंतर ४ जानेवारी २०१५ ला कळले की माझा मुलगा मृताअवस्थेत झाडाला लटकलेला आहे.
प्रत्यक्ष झाडावर लटकलेला मृतदेह पाहता ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे सर्वानाच समजले. माझ्या मुलाचे एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. त्या प्रेमप्रकरणातून झालेली ही हत्या होय. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार मी ५ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन साकोलीला दिली व त्यानंतर हे प्रकरण हत्येचे कसे आहे याबद्दल माहिती दिली.
मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिनेशेन तपास केला नाही ज्याचेवर माझा आक्षेप आहे त्याचे विरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला नाही व त्या प्रकरणाला आत्महत्या असल्याचे मान्य करून त्या प्रकारे पुढील कार्यवाही केली. त्यामुळे या प्रकरणातील संशयीत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास व कार्यवाही करावी व गुन्हेगारांना शिक्षा द्यावी अन्यथा मला २८ पासून पोलीस स्टेशन साकोली समोर आमरण उपोषण करण्यास बाध्य व्हावे लागेल व यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे नमूद आहे. (तालुका प्रतिनिधी)