जंगलातील तलावात मृतदेह आढळलेल्या महिलेचा खूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:15+5:302021-07-28T04:37:15+5:30
पवनी : तालुक्यातील चन्नेवाडा राखीव जंगलातील कृत्रिम तलावात चार दिवसांपूर्वी मृतदेह आढळलेल्या महिलेचा गळा आवळून प्रियकरानेच खून केल्याचे निष्पन्न ...

जंगलातील तलावात मृतदेह आढळलेल्या महिलेचा खूनच
पवनी : तालुक्यातील चन्नेवाडा राखीव जंगलातील कृत्रिम तलावात चार दिवसांपूर्वी मृतदेह आढळलेल्या महिलेचा गळा आवळून प्रियकरानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. ही महिला नागपूर येथील असल्याचे पुढे आले.
सरस्वती चित्रासेन बिसेना (३५) रा. पोलीसनगर, नागपूर मूळ गाव चिखली (मध्यप्रदेश) असे आहे. याप्रकरणी ओमप्रकाश तुळशीराम खोब्रागडे (४५) रा. चन्नेवाडा, ता. पवनी असे आरोपीचे नाव आहे. गत शुक्रवारी चन्नेवाडा जंगलातील कृत्रिम तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा ओमप्रकाश खोब्रागडे एका महिलेला नागपूरवरून घेऊन आला होता; परंतु दोन दिवसांनंतर ती महिला दिसली नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर ओमप्रकाशची पत्नी व मुलगा गावात आले होते. धान रोवणी करून ते पुन्हा नागपूरला गेले होते. ओमप्रकाश हा नागपूरच्या इंदिरानगरमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली. ओमप्रकाशचे सरस्वतीसोबत गत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते; परंतु ओमप्रकाशच्या मुली मोठ्या झाल्याने तिच्यापासून सुटका करायची होती. त्यासाठी तिला चन्नेवाडा येथे आणले आणि २० जुलै रोजी पहाटे जंगलात नेऊन तिच्या डोक्यावर बांबूच्या काठीने मारून गळा आवळून खून करत मृतदेह तलावात फेकल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी आरोपी ओमप्रकाश खोब्रागडे याच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पवनीच्या उपविभागीय अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जगदीश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे, पीएसआय शंकर बांगरे, नीलेश भलावे, सुमित्रा साखरकर, पोलीस हवालदार सत्यराव हेमणे, संतोष चव्हाण, गणेश बिसने, अनिल कळपते, प्रमोद आरिकर, राठोड यांनी केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.