मुरुमाची दरड कोसळून मजूर जखमी
By Admin | Updated: May 1, 2015 00:48 IST2015-05-01T00:48:39+5:302015-05-01T00:48:39+5:30
मुरुम उत्खनन करताना एका मजुरावर दरड कोसळली. यात तो गंभीर जखमी झाला.

मुरुमाची दरड कोसळून मजूर जखमी
तुमसर : मुरुम उत्खनन करताना एका मजुरावर दरड कोसळली. यात तो गंभीर जखमी झाला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. मजुराचे नाव भय्यालाल कोकुडे (४४) रा.देवसर्रा असे आहे.
सकाळी भय्यालाल कोकुडे मुरुम उत्खनन करण्याकरिता मुरुम खाणीत गेला. मुरुम उत्खनन करताना एक मोठी मुरुमाची दरड त्याच्यावर कोसळली. यात त्याचा डाव पाय फ्रॅक्चर झाला. दरड मोठी असल्याने पोटाच्या आतील भागात मुका मार बसला. आत रक्तस्त्राव होण्याची शक्यता तुमसर येथील डॉक्टरांनी वर्तविली.
सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन बाळबुद्धे, शल्यचिक्तिसक डॉ.सार्वे, डॉ.चिंधालोरेसह इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पोटाच्या आतील भागात गंभीर इजा होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. पुढील उपचाराकरिता त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले.
सोंड्या येथे शासन मान्यता प्राप्त मुरुमाची खदान आहे. भय्यालाल कोकुडे यांचा अपघात नेमक्या कोणत्या खदानीत झाला याची माहिती त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी दिली नाही. केवळ मुरुमाची दरड कोसळून अपघात झाला हे सांगितले.
महसूल प्रशासनाला यासंदर्भात विचारले असता त्यांनी सोंड्या येथे शासनमान्य मुरुमाची खदान आहे असे सांगितले. अपघाताची माहिती नाही असे सांगितले. मुरुमाच्या खदानीत सुरक्षेच्या उपाययोजना आहे किंवा नाही याची खातरजमा महसूल प्रशासनाने करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)