चिखला खाणीचे काम दिवसभर बंद

By Admin | Updated: January 15, 2015 22:45 IST2015-01-15T22:45:35+5:302015-01-15T22:45:35+5:30

चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत दरड कोसळून मलब्याखाली दाबल्या गेलेल्या मजुराचा बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मृत्यू झाला होता. मूळगाव राजापूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mud work is closed all day | चिखला खाणीचे काम दिवसभर बंद

चिखला खाणीचे काम दिवसभर बंद

तुमसर : चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत दरड कोसळून मलब्याखाली दाबल्या गेलेल्या मजुराचा बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मृत्यू झाला होता. मूळगाव राजापूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताने पुन्हा चिखला खाणीत मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आज दिवसभर माईलचे काम बंद होते. मॉईल व्यवस्थापनाच्या कामावर आमदार चरण वाघमारे यांनी नाराजी व्यक्त करुन घटनास्थळाच्या वास्तविक स्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी गोबरवाही पोलिसांना दिले आहेत.
राजापूर येथील सरस हरिराम वरकडे (४५) हा बुधवारला दुपारी २ वाजता चिखला भूमीगत खाणीत कर्तव्यावर होता. दुपारी ३.३० च्या सुमारास मॉईलच्या दुसऱ्या पाळीत काम करीत असताना सहा ते आठ फुटांची दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यावेळी वरकडे यांच्यासोबत आठ ते दहा मजूर, एक फोरमन तिथे होते. यावेळी अन्य मजुरांनी मातीचा मलबा बाहेर काढला. त्यानंतर मॉईलच्या स्थानिक डॉक्टरांकडे जखमी वरकडे यांना नेण्यात आले. वरकडे यांच्या घरी ही माहिती सायंकाळी उशिरा देण्यात आली. या अपघाताची माहिती खाण प्रशासनाने गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली नाही. उपचाराकरिता त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच वरकडे यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालय परिसरात पोलीस चौकीत माहिती देण्यात आली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी गोबरवाही पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
नियमानुसार गोबरवाही पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही. परिसरातील सरपंच, उपसरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ.हरेंद्र राहांगडाले, अशोक उईके यांनी आ.चरण वाघमारे यांना माहिती दिली. अपघातानंतर मॉईल व्यवस्थापन याच प्रकारे प्रकरण दडपत असल्याचा आरोप मजुरांनी यावेळी केला.
या अपघाताची चौकशी करण्याकरिता नागपूर येथून विभागीय मॉईल व्यवस्थापक गुरुवारी सकाळीच चिखला येथे आले. सुरक्षेची माहिती घेतली. आज दिवसभर मॉईलचे काम बंद होते. या मॉईलमध्ये कंत्राटदार मजुरांची संख्या ५०० च्या वर आहे. ते सर्व मजूर गुरुवारी कामावर गेले नाहीत. उत्पादन दिवसभर बंद होते. वरकडे यांच्या अंत्यसंस्काराला मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. आ.चरण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, डॉ.हरेंद्र राहांगडालेसह शिष्टमंडळाने गोबरवाही पोलीस ठाण्यात निवेदन देऊन घटनास्थळाची वास्तव स्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पोलीस मॉईलकडे रवाना झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mud work is closed all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.