वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा

By Admin | Updated: July 2, 2016 00:26 IST2016-07-02T00:26:38+5:302016-07-02T00:26:38+5:30

पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे.

MP Trophy competition for tree conservation | वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा

वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा

नाना पटोले यांचे आवाहन : जिल्ह्यात ८ लाख ३४ हजार रोपट्यांची लागवड
भंडारा : पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे. केवळ शासनाने पुढाकार घेऊन चालणार नाही तर लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी ७ ते १० वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात आयोजित मुख्य वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे होते. आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, सहाय्य धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, उपवनसंरक्षक एन. आर. प्रविण, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक नरेंद्र कावळे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलात खासदार व आमदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा केला. जिल्हाभरात एकाच दिवशी ८ लाख ३४ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यानिमित्ताने नागरिकांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. वनविभागाच्या २ कोटी वृक्ष लागवड मोहीमेमुळे जिल्ह्याच्या वनक्षेत्रात निश्चित वाढ होणार आहे.
यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, मानवी जीवनाच्या कल्याणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज आहे. महाराष्ट्र हिरवागार करण्याच्या दृष्टिने हे पहिले पाऊल असून वृक्ष जगविण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे खेळासाठी खासदार चषक स्पर्धा आयोजित केली जायची. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा घेतली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जलयुक्त शिवार या योजनेप्रमाणे वनयुक्त शिवार राबवून जिल्हा हिरवागार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. जास्तीत जास्त वृक्ष लावून संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकांनी घेतल्यास जिल्हा येत्या तीन वर्षात हिरवागार होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम वर्षभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: MP Trophy competition for tree conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.