पुनर्वसन कार्यालय स्थानांतरणाच्या हालचाली
By Admin | Updated: May 9, 2017 00:23 IST2017-05-09T00:23:30+5:302017-05-09T00:23:30+5:30
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन कार्यालय आंबाडी येथे आहे.

पुनर्वसन कार्यालय स्थानांतरणाच्या हालचाली
शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांचा मार्फत जलसंपदा मंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन कार्यालय आंबाडी येथे आहे. हे कार्यालय नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात स्थानांतरित करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु झाल्या आहे. कार्यालयाचे स्थानांतरण होऊ देणार नाही अशा इशारा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
पवनी येथील वैनगंगा नदीवर १९८८ ला गोसेखुर्द प्रकल्पाला पायाभरणी करण्यात आली. या राष्ट्रीय प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील १०४ गावे बाधीत झाले आहे. त्यात ३४ गावे हे पूर्णत: बाधीत आहेत. तर ७० गावे अंशत: बाधीत आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन बुडीत क्षेत्राखाली आले आहे. मागील तीस वर्षांपासून प्रकल्प बाधीत गावांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही.
काही गावांचे पुनर्वसन झाले असून अनेक गावांचा प्रश्न अधांतरी आहे. पिंडकेपार, सालेबर्डी या गावांचा नागरी सुविधांचा कामाना गती नाही.
पुनर्वसनाचे काम आंबाडी येथील कार्यालयातून सुरु आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाल आता या कार्यालयाचे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे स्थानांतरण करण्याच्या हालचाली सुरु केले आहे. जानेवारी मध्ये जलसंपदा विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. नागरिकांना नागरी सुविधा मिळायच्या पूर्वीच प्रशासनाने कार्यालय हलविण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे प्रशासनाने कार्यालय हलविण्याचा रचलेला घाट थांबवावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी गणेशपूर ग्रामपचांयतचे उपसरपंच यशवंत सोनकुसरे, यशवंत टिचकुले, मोरेश्वर वनवे, श्रावण खंगार, विनोद राकडे, रणवीर कांबळे, सोमाजी कांबळे, चंद्रकांत कारेमोरे, तुळसीदास शेंडे, रामेश्वर शेंडे, क्रिष्णा साठवणे, राजेंद्र तांबुलकर, रोहित साठवणे आदी उपस्थित होते.