मोगरा गावाची समृध्दीकडे वाटचाल
By Admin | Updated: October 26, 2015 00:53 IST2015-10-26T00:53:29+5:302015-10-26T00:53:29+5:30
लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा या गावााने स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करून राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय स्तरावर गावाची ओळख निर्माण केलेली आहे.

मोगरा गावाची समृध्दीकडे वाटचाल
नागरिकांनी घेतला ध्यास : गावात राबविले विविधांगी उपक्रम
भंडारा : लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा या गावााने स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करून राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय स्तरावर गावाची ओळख निर्माण केलेली आहे. त्याच उपक्रमाची दखल घेऊन शिवनी पासून दोन कि.मी. अंतरावरील मोगरा गावाने सुद्धा गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.
२ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबर २०१५ पर्यंत गावात विविध उपक्रम राबवून गावाला स्वच्छ व निर्मल करण्याचा मानस ग्रामस्थांनी केलेला आहे. शासनाचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात १०० टक्के शौचालय बांधकाम करण्यात आलेले असून, घरोघरी भेटी शौचालय वापरासंबंधी, वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता आदीबाबत माहिती दुर्गा उत्सव मंडळ व मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी दिली. १३ आॅक्टोबरला गावातील सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आलेली असून घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आलेली असून पशुपालकांना रस्त्यावर गुरेढोरे बांधू नये तसेच मलमुत्राची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी यासंबंधी सूचनासुद्धा या प्रसंगी करण्यात आल्या.
१५ आॅक्टोबरला रक्तदान शिबिर सामान्य रुग्णालय भंडारा यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आलेले असून गावातील जास्तीत जास्त तरुणांची रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले होते. त्यांच्या हाकेला साद देत युवावर्गाने स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. १७ आॅक्टोबरला गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे वतीने तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने चौकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी एक झाड लावून त्याचे संरक्षण व संगोपन व्यवस्थित करण्याचा मानस या प्रसंगी व्यक्त केला आहे. ३० आॅक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गावात स्वच्छतेचे विविध कार्यक्रम राबवून गावाला निर्मल ग्राम करण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आलेला असून ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधकाम करण्यात आलेले असून उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीवर १५० रुपये दंड आकारण्यात यावा तसेच उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या व्यक्तीची माहिती सांगणाऱ्यास ५० रुपये बक्षीस म्हणून देण्यात यावे असा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला असून या संबंधी गावात प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष ईश्वरदास रणशिंगे, देवीदास सार्वे, शिवचरण वाघाडे, सेवक सार्वे, सोनू राऊत, मनोज सार्वे, महेश वनवे, वसंत भोपे, दिलीप मेश्राम, पुरुषोत्तम देशमुख, दुर्गेश शेंडे, लोकेश वनवे, शांताराम सार्वे, प्रमोद बोरकर, प्रशांत वनवे, सोमेश्वर सार्वे, भीष्मा पडोळे, संदीप वाट, दिनेश सार्वे, एकनाथ सार्वे, रुपेश मरस्कोल्हे, सुभाष वाट, अशोक मरसकोल्हे, सुरेश कांबळे, गजानन वाघाये, जनार्दन बनकर, जीवन रणशिंगे, जयकृष्ण नागरीकर, संतोष सार्वे, प्रताप डहाके, मंगेश डहाके, संजय देशमुख, विजय मरसकोल्हे, वासुदेव वाघाडे, स्वप्नील मेश्राम, सोमेश्वर रेहपाडे, सोहम वनवे, कमलेश, आस्तिक सार्वे, प्रितम वनवे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच समस्त गावकरी प्रयत्न करीत आहेत. राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावकऱ्यांनी घेतलेला हा ध्यास खरोखरच अन्य गावांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मोगरा गावासारखा सर्व गावांनी ध्यास घेतल्यास सर्वत्र असलेली दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील. प्रशासनाने दखल घेऊन गावाला सहकार्याची अपेक्षा आहे.(शहर प्रतिनिधी)