पशु दवाखान्यात समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:50+5:30
मुंढरी बुज पशुवैद्यकीय दवाखान्यात घाण व चिखलच चिखल सर्वत्र आहे. यामुळे जनावरांना व शेतकऱ्यांना दवाखान्यात जाण्यास कठीणाईचा सामना करावा लागतो. जनावरांना सुधारण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या दवाखान्यामुळे जनावरे व शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडले आहे.

पशु दवाखान्यात समस्यांचा डोंगर
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अंतर्गत असलेल्या मुंढरी बुज राज्यस्तरीय पशुवैद्यकिय दवाखान्याची दूरवस्था झाली आहे. दवाखान्यात २० वर्षापासून सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचे व परिचराचे पद रिक्त आहे. दवाखाना प्रभारावर सोडण्यात आल्याने पशुवैद्यकिय विभागाचे कमालीचे दुर्लक्ष आहे. दवाखान्यात घाण, पाणी सतत साचत असल्याने डासांचे पैदास केंद्र ठरले आहे.
मुंढरी बुज पशुवैद्यकीय दवाखान्यात घाण व चिखलच चिखल सर्वत्र आहे. यामुळे जनावरांना व शेतकऱ्यांना दवाखान्यात जाण्यास कठीणाईचा सामना करावा लागतो. जनावरांना सुधारण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या दवाखान्यामुळे जनावरे व शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडले आहे. जवळच्या खातकुड्यातून उग्र वास तर सडलेल्या कचरा यामुळे तर दवाखान्यात पाय ठेवताना सुध्दा दहावेळा विचार करण्याची वेळ येते. साचलेल्या पाण्यातून शेतकरी व जनावरांना दवाखान्यात न्यावे लागत असल्याने शेतकºयांनी या दवाखान्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दवाखाना परिसर साचलेले रोगट पाण्याचे डबके झाले आहे. पाणी काढण्याचा मार्गच नसल्याने समस्या आणखी गंभीर झाली आहे. दवाखाना इमारतीमधील दुरवस्था त्यापेक्षाही अधिक रोगट आहे. स्वच्छता तर नावालाही दिसून येत नाही.
मुंढरी दवाखान्यातील डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने मोहाडी येथील सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. के. आर. दरवडे यांचेकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आलेला आहे. परंतू ते आठवड्यातून एकच दिवस येत असल्याने जनावरांचे हालबेहाल होत आहेत. आठवड्यातून निदान तीन दिवस तरी डॉक्टर देण्यात यावे, अथवा कायमस्वरुपी डॉक्टर देण्याची मागणी मुंढरी येथील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.
घाण व डासांच्या पैदासीमुळे जनावरे व शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. दवाखाना डबक्यात रुपांतरीत झाले आहे. दवाखान्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्याची गरज आहे. नुकताच दवाखान्याचा प्रभार स्विकारला असल्याने वरिष्ठांना माहिती दिली नाही.
- डॉ. के. आर. दरवाडे, प्रभारी सहायक पशुधन विकास अधिकारी, मुंढरी
तालुका पशुधन अधिकारी शेंडे यांना यासंबंधाने चौकशीसाठी आज पाठविले जाईल, पाहणी केल्यानंतर उपाययोजनेस प्राधान्य दिले जाईल.
- डॉ. सतीश राजू, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन,भंडारा
तालुका पशुधन विकास अधिकारी शेंडे यांना अनेकदा माहिती दिली असताना समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. दवाखानयाला कंपाऊंड वॉल व चिकित्सासंबंधाने साहित्य व औषधांची गरज आहे. शासनाची फिरते पशुचिकित्सालय योजना व स्वच्छ भारत अभियान फसवेगीरी करणारे आहे. विकासाचे स्वप्न विकण्यात पटाईत सत्ताधारी राजकारण्यामुळेही शेतकरी व पशुपालकांचे नुकसान होत आहे.
- एकनाथ चौरागडे, सरपंच, मुंढरी