मोटरपंप चोरणारी टोळी पवनी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:17+5:302021-02-05T08:39:17+5:30
सतीश उर्फ प्रशांत रंगारी (२७), शरद माणिराव सावरबांधे (३८), बंबू उर्फ बबलू मन्साराम फुंडे (३०, रा. निघवी) अशी चोरट्यांची ...

मोटरपंप चोरणारी टोळी पवनी पोलिसांच्या जाळ्यात
सतीश उर्फ प्रशांत रंगारी (२७), शरद माणिराव सावरबांधे (३८), बंबू उर्फ बबलू मन्साराम फुंडे (३०, रा. निघवी) अशी चोरट्यांची आणि राहुल विनायक गणवीर (२८, रा. आसगाव, ता. पवनी) असे मोटरपंप विकत घेणाऱ्याचे नाव आहे. गत सहा महिन्यांपासून पवनी तालुक्यातील विविध गावांतून शेतशिवारातून मोटरपंप चोरीस जात होते. ऐन हंगामात मोटरपंप चोरीस गेल्याने शेतकऱ्यांचे सिंचन खोळंबत होते. अनेकांना मोठा आर्थिक फटका बसत होता. परंतु चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी चोरांना पकडण्याचे निर्देश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात नीलेश भिलावे, शंकर पांगारे यांनी तपास सुरू केला. गोपनीय माहितीवरून चोरटे निघवी येथील असल्याची माहिती मिळाली. तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनी सहा गुन्ह्यांमध्ये ९ मोटरपंप लंपास केल्याचे पुढे आले. मोटरपंपांची विक्री कुठे केली, असे विचारले असता त्यांनी आसगाव येथून राहुल गणवीर याला विकल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी आसगाव येथून राहुल गणवीरलाही अटक केली. ही कारवाई पोलीस हवालदार पोलीस चुटे, कळपते, चव्हाण, शाहू, आरीकर यांनी केली.