‘आई मला मारु नकोस’ स्त्री भ्रूण हत्येवरील वास्तव

By Admin | Updated: February 23, 2017 00:24 IST2017-02-23T00:24:45+5:302017-02-23T00:24:45+5:30

देशाने औद्योगिक क्रांतीत प्रगती साधली असली तरी आजही अनेक समाजात मुलींच्या जन्माला विरोध असल्याचे चित्र दिसून येते.

'Mother do not kill me' The reality about female feticide | ‘आई मला मारु नकोस’ स्त्री भ्रूण हत्येवरील वास्तव

‘आई मला मारु नकोस’ स्त्री भ्रूण हत्येवरील वास्तव

खडीगंमत महोत्सवात मांडले वास्तव : मुलगी वाचवा-मुलगी वाचवा कथानकाने प्रेक्षक भारावले
भंडारा : देशाने औद्योगिक क्रांतीत प्रगती साधली असली तरी आजही अनेक समाजात मुलींच्या जन्माला विरोध असल्याचे चित्र दिसून येते. मुलासाठी मातेच्या गर्भातच मुलींना संपविले जाते. स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार वाढत असल्याने मुलींचा जन्मदर कमी होत आहे. त्यामुळे मुलींच्या जन्माला विरोध करू नका, यावर ‘आई मला मारू नको’ या कथानकातून खडीगंमत महोत्सवात समाजातील वास्तव मांडण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे चार दिवसांपासून खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्त्री भ्रूण हत्या थांबवून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ असा समाजासाठी आदर्शवत संदेश देणारा प्रयोग सादर करण्यात आला. या कथानकातून समाजातील स्त्री भ्रूण हत्येतील जिवंतपणा दाखविण्यात आला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनाही मुलगा नको मुलगी वाचवा अशा प्रेरणादायी संदेशाची महती कळली.
सात दिवसीय खडीगंमत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील खंडाळा (निलज) येथील शाहीर ब्रम्हा नवखरे यांच्या मंडळाने या जिवंतपणाचे सादरीकरण केले. ‘आई मला मारू नको’ या सादरीकरणावर उपस्थितांनी स्तुतीसुमने उधळली. प्रारंभी गायनानंतर त्यांनी गवळण सादर केली. त्यानंतर स्त्री भ्रूण हत्येवरील जिवंतपणाचे सादरीकरण केले. सहशाहीर सुभाष नवघरे, ढोलकीवादक अरुण येसनसुरे, अतुल लांडे, मंगेश नान्हे यांनी साथ दिली. या सादरीकरणाच्या दरम्यान अतुल लांडे व मंगेश नान्हे यांनी नर्तकीची भूमिका वठवून उपस्थितांना रिझविले. गमत्याकार म्हणून विजय घारड यांनी भूमिका निभवली तर टाळकरी म्हणून शालीक उके यांनी झिलकारी हे फ्लोट वाजवून ग्रामीण प्रेक्षकांना खिळविले. वसंता घारड यांनी चोनक्या तर शालीक उके हे टाळकरी यांच्या तालावर ग्रामस्थ आनंदित झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहीर सहादेव गणवीर यांच्या गायनाने झाले. यावेळी यादवराव कापगते, मारोतराव कापगते उपस्थित होते. प्रास्ताविक शाहीर सुबोध कानेकर यांनी तर संचालन शाहीर भगवान दहिवले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

स्त्री भ्रूण हत्येवरील कथानकाने मन हेलावले
या कथानकातून चार मुली झाल्यानंतर पाचवी मुलगी होऊ नये, म्हणून पती व सासू यांचा अत्याचार सहन करणाऱ्या गर्भवतीची ही कहाणी उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. या गर्भवतीच्या कहाणीत तिचा होणाऱ्या छळाचे सादरीकरण करण्यात आले. या सोबतच स्त्री भ्रूण हत्या करू नये, असा मौलिक संदेश या कलावंतांनी दिला. ग्रामीण भागातील या कलावंतांनी समाजात घडणाऱ्या प्रसंगाचे सादरीकरण केल्याने अनेकांचे हृदयपरिवर्तन झाले.

Web Title: 'Mother do not kill me' The reality about female feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.