तुमसर पोलिस ठाण्यात पोलीसांची अर्धेअधिक पदे रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:48+5:302021-03-07T04:32:48+5:30
जनतेच्या जीवीताची व मालमत्तेला योग्यरित्या संरक्षण द्यावे, गुन्हेगारांवर वचक बसावा, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित ...

तुमसर पोलिस ठाण्यात पोलीसांची अर्धेअधिक पदे रिक्तच
जनतेच्या जीवीताची व मालमत्तेला योग्यरित्या संरक्षण द्यावे, गुन्हेगारांवर वचक बसावा, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, यासाठी गृह विभागाद्वारे पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली आहे. तुमसर पोलीस ठाण्याला दीड लाख लोकसंख्येसाठी १०५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असतांना केवळ ५५ पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर ५० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची जागा अजूनही रिक्त आहे. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा आलेख पाहता तुमसर पोलीस ठाण्यात असलेला अपुरू अधिकारी व कर्मचारी वर्गामुळे पोलिसांच्या कामाचा व्याप आपसूकच वाढला आहे. यामुळे पोलिसांना कर्तव्य बजावताना तारेवरची कसरतच करावी लागते. अपुऱ्या संख्याबळामुळे २४ तास काम करावे लागत असल्याने त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. याशिवाय दैनंदिन कामकाजाकरिता जसे स्टेशन डायरी, वायरलेस, वाहतूक पोलीस, कोर्ट पैरवी, समन्स वॉरंट, चालक असे अर्धे कर्मचारी कर्तव्यावर ठेवावे लागतात. त्यातल्या त्यात बंदोबस्त, महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा, उत्सव व यात्रा, आंदोलने, नेत्यांचे दौरे, सभा संमेलने, या ठिकाणी याच संख्याबळातून सुरक्षा प्रदान करावी लागत आहे. परिणामी संख्याबळाअभावी तुमसर पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे, अवैध दारु विक्री, अवैध रेती तस्करी, उत्खनन व वाहतूक यावर वचक नसते व अवैध धंदे फोफावण्यास न कळत वाव मिळत आहे. तपासावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते आहे. या कडे लोकप्रतिनिधी कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. उलट हे सर्व पोलिसांनीच करायला पाहिजे हे त्यांचे काम आहे, यासर्व बाबतीत पोलिसांनाच दोषी ठरवून त्यांच्या नावांची बोंब लोकप्रतिनिधींकडून मारली जाते. मात्र पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होतांना दिसत नाही, हे अजूनपर्यंत न उकलणारे कोडे ठरले आहे. परंतु या जनहिताच्या प्रश्नांकडे गांभीर्यपुर्वक लक्ष पुरवून तुमसर पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे