महिनाभरापासून मंडळ कृषी कार्यालय कुलूपबंद
By Admin | Updated: September 4, 2015 00:16 IST2015-09-04T00:16:29+5:302015-09-04T00:16:29+5:30
सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे महिनाभरापुर्वी स्थानांतरण करण्यात आले असले तरी, ...

महिनाभरापासून मंडळ कृषी कार्यालय कुलूपबंद
भाडेतत्वाची आडकाठी : आधी कार्यालयाचे स्थानांतरण करा, नंतरच भाडे निश्चिती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी
रंजित चिंचखेडे चुल्हाड
सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या रिकाम्या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे महिनाभरापुर्वी स्थानांतरण करण्यात आले असले तरी, कार्यालय कुलूप बंद असल्याने शेतकऱ्यांची वाताहत सुरू झाली आहे.
सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाची निर्मिर्ती करण्यात आली आहे. या विभागात कर्मचाऱ्यांचे वास्तव्यासाठी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. भंगारात तथा वसाहत जीर्ण होण्यापेक्षा या इमारतीचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आ. चरण वाघमारे यांना केली होती. त्याप्रमाणे जागा आणि इमारतअभावी सिहोऱ्याचा मंडळ कृषी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार ७ कि़मी. अंतरावरील हरदोली गावातून होत असल्याने या कार्यालयाचे स्थानांतरण रिकाम्या वसाहतीत करण्याचे नियोजन तयार केले गेले. पाटबंधारे आणि कृषी विभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने स्थानांतरणात आडकाठी येणार नाही, अशी खबरदारी घेण्यात आली.
पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत एका खोलीला प्रशासकीय कामकाज करिता कृषी विभागाने रंगरंगोटी तथा स्वच्छता केली. १ जुलैला आ. चरण वाघमारे यांचे हस्ते या वसाहतीत मंडळ कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सिहोरा गावात कृषी कार्यालयाचे स्थानांतरण झाल्याचा परिसरात गवगवा करण्यात आला. पाणलोट योजनेच्या अध्यक्ष आणि सचिवांनी ही आनंदाची माहिती गावा ंगावात पेरली. या माहितीने शेतकरी सुखावला असता पाटबंधारे विभागाने 'ये तेरा घर, ये मेरा घर'चा फार्मूला उपस्थित केला. दुपारी १२ वाजता कार्यालयाचे उद्घाटन झाले असता सायंकाळी ५ वाजता पाटबंधारे विभागाने स्वत:चे कुलूप मंडळ कृषी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला ठोकले.
भाडे तत्वाचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे गेल्या महिनाभरापासून कागदी घोडे नाचविले जात आहेत. या खोल्याचे भाडे आता सार्वजनिक बांधकाम विभाग ठरविणार आहे. तिन्ही विभागात कागदोपत्री देवाण घेवाण सुरू झाली आहे. जिल्हास्तरावर असे पत्रव्यवहार केले जाणार असल्याची माहिती तिन्ही विभागाची यंत्रणा सांगत सुटली आहे. परंतु या पत्रव्यवहार आणि स्थानांतरणाला अनेक महिण्याचा कालावधी लागणार असल्याचे सुतोवाच करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी तिघांच्या भांडणात अडकला आहे.
सिहोऱ्यात मंडळ कृषी कार्यालय असल्याचे कारणावरून शेतकरी याच ठिकाणी महत्वपूर्ण कार्यायासाठी धाव घेत आहेत. परंतु कार्यालय सदैव कुलूप दिसत असल्याने माघारी परतत आहेत. पुन्हा नंतर हरदोली गावाला गाठावे लागत आहे. दुहेरी त्रास आता सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
आधी मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण करा. नंतर भाडे निश्चित करणारी प्रक्रिया पूर्ण करा, असा सूर परिसरात आहे. परंतु यात यंत्रणा भांडण करण्याचे स्थितीत नाही. स्थानांतरणाचे आ. वाघमारे यांचे निर्देश असतानाही भाडे तत्वाची आडकाठी आडवी आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे सुरू झाल्याने विरोधकानी उद्घाटनाचा फार्स करण्यात आल्याची कुजबूज सुरू केली आहे. यामुळे परिसरात राजकीय वातारण तापू लागले आहे.