लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामाच्या प्रारंभीच काही भागांत डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे, तर काही कृषी केंद्रचालकांना खत कंपन्यांनी १८ मेट्रिक टन युरियासोबत ३० हजाराचे लिंकिंग जबरीने दिल्याची माहिती नाव छापण्याच्या अटीवर मिळाली आहे.
त्यातच शेतकऱ्यांना २०-२०-०१३, १०-२६-२६, २४-२४-०० व १२-३२-१६ या मिश्र खताच्या किमती अधिक असतानाही नाईलाजाने खरेदी करावी लागत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी जिल्ह्यात युरिया खताचा एकूण उपलब्ध साठा १८,३९२ मेट्रिक टन असून, आतापर्यंत ५९८१ मेट्रिक टन एकूण विक्री झाली आहे. सद्यःस्थितीत १२,४११ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून २९,५०० मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली आहे. सध्या डीएपी खताचा एकूण साठा १३१४ मेट्रिक टन असून, आतापर्यंत ६४६ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली, तर ६६८ मेट्रिक टन डीएपीचा साठा शिल्लक आहे.
खरीप हंगाम सुरू झाल्याने रासायनिक खतांची मागणी वाढणार आहे; परंतु प्रारंभीच्या काळातच जिल्ह्यातील काही भागांत डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कंपन्यांनी काही कृषी केंद्रचालकांना जबरीने युरिया खतासोबत लिंकिंग दिल्याने करावे तरी काय, असा प्रश्न कृषी केंद्रचालकांसमोर उभा ठाकला आहे.
६६८ मेट्रीक टन डीएपी खताचा साठा शिल्लकऐन हंगामाच्या प्रारंभीच लिकिंगचा मार शेतकऱ्यांना झेलावा लागत आहे. कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या अहिताचे ठरत आहे.
पिकांची वाढ आणि विकासासाठी डीएपी आवश्यकडीएपी खतातील नायट्रोजन पिकाच्या सुरुवातीच्या वाढीस मदत करते, तर फॉस्फरस मुळांची वाढ करते. त्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळात जून ते जुलै या दोन महिन्यांतच याची सर्वाधिक मागणी असते. मात्र, नेमक्या याच कालावधीत हे खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे. परिणामी, पर्यायी खतांचा वापर वाढीस लागला आहे.
आयातीवर अवलंबून डीएपी खताचा पुरवठादेशात डीएपी खताचे उत्पादन होत नाही. हे खत अनेक देशांतून आयात केले जाते. यामध्ये प्रामुख्याने चीन, रशिया, सौदी अरेबिया, मोरोक्को, जॉर्डन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.
युरियासोबत झाली या खताची लिंकिंगखत कंपन्यांनी युरियासोबत लिंकिंग खत घेण्यासाठी दबाव टाकून मायक्रोराजा, सल्फर, मायक्रोन्युट्रन्स यांची लिंकिंग केली आहे. हंगामात युरियाअभावी व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेत कंपन्यांनी कृषी केंद्रचालकांच्या अगतिकतेचा फायदा उचलल्याचे बोलले जात आहे. या खताच्या लिकींगचा भूर्दंड बळीराजाच्या मानगुटीवर बसत आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे.
चूक कुणाची, दोष कुणाला ?या प्रकरणी कृषी विभाग चौकशीअंती खत कंपन्यांवर कारवाई करणार की, नेहमीप्रमाणे कृषी केंद्रचालकांनाच दोषी ठरविणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, सध्यातरी कृषी विभागाकडून कुणाच्याही तक्रारी नसल्याचे सांगून या प्रकरणी पांघरूण घालण्याचा प्रयत्न होत आहे.
"जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा नाही. तसेच युरिया खतासोबत लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी नाहीत. कृषी निविष्ठाविषयी अडचणी व तक्रारी सोडविण्यासाठी कृषी विभागाचा भ्रमणध्वनी ७०५८२१७९७७ वर संपर्क साधावा."- विकास सोनवाने, जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. भंडारा.