जिल्ह्यात पुरुषांचीच मक्तेदारी
By Admin | Updated: September 27, 2014 23:10 IST2014-09-27T23:10:07+5:302014-09-27T23:10:07+5:30
राजकीय सारीपाटावर महिलांना बरोबरीचा दर्जा आणि आरक्षण देण्याच्या घोषणा केवळ ‘राजकीय बाता’ ठरू लागल्या आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात केवळ एक महिला वगळता भंडारा जिल्ह्यात

जिल्ह्यात पुरुषांचीच मक्तेदारी
भंडारा : राजकीय सारीपाटावर महिलांना बरोबरीचा दर्जा आणि आरक्षण देण्याच्या घोषणा केवळ ‘राजकीय बाता’ ठरू लागल्या आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात केवळ एक महिला वगळता भंडारा जिल्ह्यात पुरुषांचीच मक्तेदारी दिसून आली. शनिवारी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यावर शिक्कामोर्तबही झाले.
पूर्वी युती आणि आघाडीत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका मागील कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच स्वबळावर होत आहे.
२५ वर्षांपूर्वी भाजपा व शिवसेनेने तर १५ वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. एवढ्या वर्षानंतर आता स्वतंत्र निवडणुका लढण्याची संधी मिळाली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चारही प्रमुख राजकीय पक्षांसह मनसे, भाकपा, सपा, रिपाईचे विविध गट व अन्य पक्षांमध्ये स्त्रीशक्ती दुर्लक्षित असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकच महिलेला तुमसर क्षेत्रात आमदार होण्याची संधी मिळाली होती.
राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन विधानसभेच्या काही जागा महिलांसाठी आरक्षित करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. महिलांची सर्वच क्षेत्रातील भरारी आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या बाण्यामुळे किमान एकतरी मतदारसंघ महिलांच्या वाट्याला येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात एकही मतदारसंघ महिला प्रवर्गासाठी सोडण्याची एकाही राजकीय पक्षाची तयारी नाही.
विधानसभा मतदार संघासाठी सक्षम महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यासह अन्य पक्षात आहे. काही अभ्यासू महिला तर पुरुषांपेक्षाही सरस ठरत आहेत. मात्र पुरुषी मक्तेदारी त्यांना सतत मागे लोटताना दिसून आले आहे.
सर्वच पक्षात आमदारकीचा दीर्घ अनुभव घेतलेले नेते आहेत. मात्र त्यांची राजकीय भूक अद्याप शमलेली नाही. आपण मागे राहून आपल्या मतदारसंघाची सूत्रे एखाद्या महिलेकडे देण्याची हिंमत एकाही नेत्याने जिल्ह्यात दाखविलेली नाही. उलट ज्या कुणाकडे अशी सूत्रे असतील, त्यांचे दोर कापण्याचाच प्रयत्न केलेला आहे. (शहर प्रतिनिधी)