Monitoring of crop crop damage | धान पिकाच्या नुकसानीची पाहणी
धान पिकाच्या नुकसानीची पाहणी

ठळक मुद्देपावसाची संततधार कायम : पवनी, साकोली तालुक्यात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचे स्वरुप आले असून तालुक्यातील कोसरा, आकोट, गोसेखुर्द, चिचाळा, वासेळा गावांतील धानपिक पाण्याखाली बुडाले आहे. भातखाचरांना पाण्याने चौफेर वेढा दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक पाण्यात आहे. शेतकऱ्यांनी माहिती देताच तात्काळ दखल घेत भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तांत्रिक अधिकारी गायधने यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली.
यावेळी विविध गावांतील पूरस्थितीचा आढावा घेत मिलिंद लाड यांनी आपल्या सहकार्यांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. झालेल्या नुकसानीची माहिती दिली. शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या धानपिकासह इतर पिकांचे गावनिहाय तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्यामार्फत तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याची ग्वाही यावेळी चमूने दिली.
कोटांगले यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल व त्यानुसार कर्मचाऱ्यांना पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश दिले. यावेळी पाहणीदरम्यान अनेक शेतकऱ्यांचे धानपीकासह, सोयाबीन पीक पूर्णत: पाण्याखाली बुडाल्याने कुजलेल्या अवस्थेत दिसून आले. शेतात साठलेले पाणी बांधीच्या बाहेर काढून पिकाला नवसंजीवनी देण्यासाठी खते टाकणे गरजेचे असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही देण्यात आली.

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसनवार करुन धान पीकाची रोवणी केली होती.परंतु अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांनी व्यथा कृषी अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवून कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांकडून धानपिकासह सोयाबीन,तूर पिकाचे पंचनामे केले जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

Web Title: Monitoring of crop crop damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.