एटीएममधून पैशाची फसवणूक करणाऱ्याला अद्याप अटक नाही
By Admin | Updated: June 16, 2017 00:16 IST2017-06-16T00:16:35+5:302017-06-16T00:16:35+5:30
२५ दिवसांपूर्वी कॅनरा बँक तुमसर येथील एटीएम मधून १५ हजार रुपयांची चोरी करण्यात आली.

एटीएममधून पैशाची फसवणूक करणाऱ्याला अद्याप अटक नाही
तुमसर पोलिसांचे अपयश : आरोपीच्या अटकेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : २५ दिवसांपूर्वी कॅनरा बँक तुमसर येथील एटीएम मधून १५ हजार रुपयांची चोरी करण्यात आली. प्रकरणी तुमसर पोलिसात संशयीत आरोपीचे छायाचित्र व अन्य माहिती पुरविण्यात आली. परंतु अद्याप तुमसर पोलिसांना चोरीचा उलगडा करण्यात यश आलेले नाही.
तपास चालू आहे, असेच उत्तर दिले जात आहेत. तुमसर पोलिसांनी प्रकरणी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक करण्याची मागणी तक्रारदार अनिल नखाते बोरगाव यांनी केली आहे. २० मे २०१७ रोजी कॅनरा बँक तुमसर येथील एटीएम मधून १५००० रुपयांची चोरी करण्यात आली. प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तुमसर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. दि. २३ मे रोजी तोच अज्ञात व्यक्ती पुन्हा त्याच बँकेच्या एटीएम मधून दुसऱ्या व्यक्तीची त्याचप्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडण्यात कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांना अपशय आले. प्रकरणाचा तपास तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी जाधव यांचेकडे आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावून प्रकरणासंबंधाने वारंवार विचारणा केली असताना त्यांचेकडून फक्त तपास चालू आहे. एवढेच उत्तर नेहमी दिले जाते. त्यामुळे प्रकरणी न्याय मिळणार काय? असा प्रश्न फिर्यादीने उपस्थित केला आहे.
एकीकडे ज्या प्रकरणाची सुतराम माहिती व पुरावे पोलिसांकडे नसतात त्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश येते. परंतु एटीएम मधून पैशाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सीसीटीव्हीचे फुटेज मिळून सुद्धा तपास चालू आहे, असे मिळणारी उत्तरे मनस्ताप वाढविणारे आहे.
पोलिसांना तक्रार देवून १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु प्रकरणी तपास थंडबस्त्यात आहे. कामगार असलेल्या तक्रारदाराला पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चोरी गेलेले पैसे परत मिळण्याची खात्री आहे. परंतु चोरीचा तपासच लागत नसेल तर याला काय म्हणावे?