मोहाडीत नगराध्यक्षपदासाठी चुरस
By Admin | Updated: November 22, 2015 00:27 IST2015-11-22T00:27:52+5:302015-11-22T00:27:52+5:30
जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तिनही नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर होताच अध्यक्षपदासाठी मोहाडीत मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.

मोहाडीत नगराध्यक्षपदासाठी चुरस
३० ला होणार निवडणूक : चार महिला उमेदवार शर्यतीत
सिराज शेख मोहाडी
जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तिनही नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर होताच अध्यक्षपदासाठी मोहाडीत मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. अध्यक्षपदावर कोण विराजमान होतो, हे ३० नोव्हेंबर कळणारच आहे.
मोहाडी नगर पंचायत निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच कुणाला अध्यक्ष करणार याकडे लक्ष लागले आहे.
ही जागा ओबीसी महिला प्रवर्गाकरिता राखीव असल्यामुळे चुरस वाढली आहे. अध्यक्षपदासाठी रागिणी सेलोकर, स्वाती निमजे, गीता बोकडे आणि कविता बावणे या नगरसेविका शर्यतीत आहेत. प्रत्येकच उमेदवार हे पद आपल्याला मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. पक्षश्रेष्ठीनी या चारही महिलांचा बायोडाटा तयार केला असून यात कोण सर्वश्रेष्ठ ठरतो ते वेळच सांगणार आहे. मात्र उपाध्यक्षपदासाठी सुनिल गिरीपुंजे यांचे एकमेव नाव समोर असल्याने त्यांचे उपध्यक्षपद निश्चित असल्याचे मानले जात आहे.
जातीय समिकरणानुसार अध्यक्षपद हलबा कोष्टी समाजाला तर उपाध्यक्षपद ओबीसी समाजाला मिळावे, अशी अपेक्षा असल्यामुळे अध्यक्षपदासाठी स्वाती निमजे व गिता बोकडे या उमेदवारातुन एकाला उमेदवारी दिली जाईल. असंतुष्टांना सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र २६ नोव्हेंबरला ११ ते २ या कालावधीत, छानणी दुपारी २ ते ५ पर्यंत, उमेदवारी मागे घेण्याची तारीख २८ नोव्हेंबर ला चारवाजेपर्यंत तसेच निवडणुक विशेष सभा ३० नोव्हेंबरला ११.३० वाजता निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या उपस्थितीत होणार आहे. ३० नोव्हेंबरला उपाध्यक्षपदाचे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार असून त्याच सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जातील. नगर पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाकडे आता येथील जनतेचे लक्ष लागलेले असुन आतातरी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.