मोहाडीचा ‘प्रोजेक्ट ग्रीन’ परिसर झाला पुन्हा पडीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:16 IST2018-10-31T22:15:58+5:302018-10-31T22:16:16+5:30
ओसाड आणि पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ‘प्रोजेक्ट ग्रीन’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तहसील कार्यालयामागील परिसर हिरवागार झाला. मात्र त्यांचे मोहाडी येथून स्थानांतरण झाले आणि हिरवीगार झाडे करपली. प्रोजेक्ट ग्रीन परिसर पुन्हा पडीक अवस्थेत परावर्तीत झाला.

मोहाडीचा ‘प्रोजेक्ट ग्रीन’ परिसर झाला पुन्हा पडीक
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : ओसाड आणि पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ‘प्रोजेक्ट ग्रीन’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तहसील कार्यालयामागील परिसर हिरवागार झाला. मात्र त्यांचे मोहाडी येथून स्थानांतरण झाले आणि हिरवीगार झाडे करपली. प्रोजेक्ट ग्रीन परिसर पुन्हा पडीक अवस्थेत परावर्तीत झाला.
मोहाडी तहसील कार्यालयामागील विस्तीर्ण जागा आहे. त्या जागेचे कुरण झाले होते. ओसाड आणि पडीक जागेकडे कुणाचेही लक्ष नव्हते. मात्र तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी या परिसराचा कायापालट करण्याचा विडा उचलला. महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, तलाठी तसेच लोकसहभागातून प्रोजेक्ट ग्रीन अस्तित्वात आणले. वृक्षांच्या संवर्धनासाठी तहसीलमधील हातपंपावर जेटपंप बसविण्यात आले. ड्रीप लाईन टाकून झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचले. या ठिकाणी चिक्कू, आंबा, पेरू, अॅपल बोर, शेवगा आदी ४० प्रजातीची वृक्ष वाढू लागली. ओसाड जागेवर जणू नंदन फुलले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी या प्रकल्पाची प्रशंसाच नाही तर तेथे येऊन वृक्षारोपण केले. शिक्षण आयुक्त धीरज कुमार, सचिव दीपक कपूर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी भेटी दिल्या. या परिसरात जनावरे घेऊन जाणाऱ्यांना दंड होऊ लागला. त्यामुळे कुणीही तिकडे फिरकेना.
मात्र तहसीलदार धनंजय देशमुख यांचे येथून स्थानांतरण झाले. त्यामुळे प्रोजेक्ट ग्रीनकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. आता वृक्ष संवर्धनासाठी लावलेले कठडे गवतात लपले आहेत. वृक्षही वाळत आहेत. काही ठिकाणचे कठडे तर चोरीला गेले आहेत. गत दीड वर्षात पुन्हा हा परिसर ओसाड दिसू लागला.
पाण्याअभावी करपली झाडे
शासन पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. कोट्यवधी रुपयांचा त्यावर खर्चही करते. मात्र लोकसहभागातून येथे विकसीत झालेल्या प्रोजेक्ट ग्रीनकडे अल्पावधीतच दुर्लक्ष झाले. आता प्रशासनाच्या परिसरातील संवर्धित झाडे पाण्याअभावी करपू लागले आहेत. यापेक्षा दुर्देव ते कोणते याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे.