मोहाडी ग्रामीण रुग्णालय 'कोमात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:37 IST2018-09-29T21:37:01+5:302018-09-29T21:37:17+5:30

Mohadi Rural Hospital 'Comat' | मोहाडी ग्रामीण रुग्णालय 'कोमात'

मोहाडी ग्रामीण रुग्णालय 'कोमात'

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : अनेक रुग्णांच्या डोळ्यात आले पाणी

सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील ३० हजार जनतेच्या आरोग्य सुधारणेसाठी तयार करण्यात आलेले आधुनिक ग्रामीण रुग्णालय कोमात गेल्याने येथे येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यात दु:खाचे पाणी येत आहे आणि याला सर्वस्व जबाबदार आरोग्य सेवेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे येथील जनतेला खासगी डॉक्टरांकडे जाऊन भुर्दंड सोसावा लागत आहे.
मोहाडी ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील एकमेव आधुनिक चिकित्सालय आहे. मात्र येथे कोणत्याही सेवा नियमित उपलब्ध राहत नाही. ‘रेफर टू भंडारा’ हे एकमेव कार्यक्रम येथे सुरु आहे. सध्या पाऊस व तीव्र उन यामुळे अनेक प्रकारचे आजार बळावले आहेत. प्रत्येक कुटुंबातील किमान एकतरी व्यक्ती आजारी पडलेला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. या रुग्णालयात होमीओपॅथी, युनानी व आयुर्वेदिक असे तीन नियमित डॉक्टर आहेत. तर एमबीबीएस डॉक्टर दोन आहेत. यापैकी एक डॉक्टर हेडाऊ हे आजारी रजेवर आहेत. दुसरे रुग्णालयाचे अधीक्षक असल्याने त्यांना मिटींगमध्ये जाण्यापासून वेळच मिळत नाही. चार पाच दिवसांपासून येथील वैद्यकीय अधीक्षक नागपूर येथे ट्रेनिंगसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाºयावर कोणाचेही नियंत्रण नाही. कर्मचारी मनमर्जीप्रमाणे रुग्णांसोबत वागत आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेला पाहून सिहोरा येथून एक डॉक्टर प्रतिनियुक्तीवर मोहाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वातावरण बदलामुळे या रुग्णालयात दररोज ३०० च्या जवळपास रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मात्र आवश्यक औषधांचा तुटवडा आहे. सोयी सुविधा अपुºया आहेत. एक्सरे दोनच दिवस सुरु राहतो. शल्य चिकित्सागृह धुळ खात पडला आहे. मधुमेह तपासणी स्ट्रीप उपलब्ध नाहीत. डेंग्यू तपासणी कीट उपलब्ध नाही. पाण्याच्या टाकीत डासांच्या अळ्या पडलेल्या आहेत. अशा अनेक समस्या येथे आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला जिल्हा शल्य चिकित्सकाकडे त्यांच्या व्यस्त कामामुळे वेळच नाही. लोकप्रतिनिधीही समस्यांपासून अनभिज्ञ आहेत.
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे प्रतिनियुक्तीवर डॉ.शुभम आकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सध्या ते जास्तच 'फार्म'मध्ये आहेत. संबंधितांना चांगली वागणूक व अनोळखी रुग्णासोबत अरेरावीने वागण्याची पद्धत सुरु केली आहे. येथे येणारे रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील असतात. हे त्यांना चांगले ठाऊक असल्याने ते रुग्णांसोबत भेद करतात. मात्र पूर्वीच आजाराने त्रासलेल्या अशा रुग्णाला पुन्हा या प्रकाराने मानसिक आघात होतो. परिचारिका आपल्या पदनामाप्रमाणे वागत नाहीत.
होमियोपॅथी, आयुर्वेदिक औषधी बेपत्ता
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे नियमित आयुर्वेदिक, होमियोपॅथीचे डॉक्टर आहेत. मात्र त्यांची औषधी वर्षभरापासून उपलब्ध नाहीत. आयुष विभागाचे नाव मोठे दर्शन खोटे असा प्रकार आहे. शुद्ध भारतीय चिकित्सा पद्धतीचेच औषधी शासन उपलब्ध करून देत नसल्याने हे डॉक्टर नाईलाजास्तव अ‍ॅलोपॅथीची औषधी रुग्णांना लिहून देतात.

Web Title: Mohadi Rural Hospital 'Comat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.