मोहाडी नगरपंचायतीची कामे खोळंबली
By Admin | Updated: January 23, 2016 00:53 IST2016-01-23T00:53:51+5:302016-01-23T00:53:51+5:30
नगरपंचायत मोहाडी येथील अनेक कामे खोळंबली असून यासाठी नगर परिषद पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना ....

मोहाडी नगरपंचायतीची कामे खोळंबली
समस्या सुटणार काय ? : मुख्याधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी
मोहाडी : नगरपंचायत मोहाडी येथील अनेक कामे खोळंबली असून यासाठी नगर परिषद पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना जबाबदार ठरविले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी बदलविण्याची मागणी सुद्धा केली आहे.
मोहाडी नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरवेल, रस्ते, नाल्या, पथदिवे यांच्या दुरूस्तीचे काम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबद नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना विचारणा केली असता मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या हटधर्मी प्रवृत्तीमुळे अनेक कामांचे बिले अडलेले असल्याने कामे कशी करावी, असे उत्तर देण्यात आले.
मुख्याधिकारी गुल्हाणे हे मोहाडी नगर परिषद कार्यालयात बरोबर येत नाही. प्रत्येक कामासाठी येथील कर्मचाऱ्यांना तुमसर येथे फाईली घेवून बोलवतात. बोरवेल दुरूस्तीचे बिल, ब्लिचिंग पावडरचे बिल, इलेक्ट्रिक साहित्यांचे बिलावर त्यांनी स्वाक्षरी न केल्याने नवीन कामे कशी करणार अशी नगर परिषद पदाधिकाऱ्यांची स्थिती झालेली आहे. मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी दोन जानेवारीला मोहाडी न.प. चा पदभार घेतला तेव्हापासून फक्त दोन तीन वेळाच ते या कार्यालयात आले. आर्थिक देवाण घेवाणीचे अधिकार त्यांच्याकडे असल्याने न.प. पदाधिकाऱ्यांची मोठीच गोची झालेली आहे.
आता मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी नवीन आदेश काढला आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रोफिशनल टॅक्स कापण्यात यावे. यापुर्वी येथील एकाही कर्मचाऱ्याचे प्रोफेशनल टॅक्स कापण्यात येत नव्हते. नियमानुसार ७ हजार ५०० रूपयांच्यावर वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचेच प्रोफेशनल टॅक्स कापण्यात येते. येथील फक्त दोन कर्मचाऱ्यांचा वेतन सात हजार ५०० वर आहे. त्यामुळे वेतनाचे बनविलेले बिल दोनवेळा त्यांनी नामंजुर केले. या प्रकारामुळे येथील कर्मचारी सुद्धा वैतागलेले आहेत. वेतनातून कापण्यात आलेला प्रोफेशनल टॅक्सचा पैसा टॅन नंबर काढून भरावा लागतो. मात्र मोहाडी नगर पंचायतीचा टॅन नंबर काढलेला नाही. त्यामुळे कापलेला पैसा भरावा कोठे असा प्रश्न लेखापालावर येवून ठेपला आहे. यासर्व प्रकारामुळे मुख्याधिकारी गुल्हाणे यांना बदलवून मोहाडी येथीलच नायब तहसिलदारांना प्रभार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)