मोहाडीत तीन दिवसांपासून नळ बंद
By Admin | Updated: May 23, 2015 01:04 IST2015-05-23T01:04:01+5:302015-05-23T01:04:01+5:30
येथील नळाला तीन दिवसांपासून पाणी न आल्यामुळे मोहाडीत पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.

मोहाडीत तीन दिवसांपासून नळ बंद
मोहाडी : येथील नळाला तीन दिवसांपासून पाणी न आल्यामुळे मोहाडीत पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. त्यामुळे नागरिकांनी नगर पंचायतीत धडक देऊन संताप व्यक्त केला.
मोहाडीत दोन महिन्यांपासून नळाला एक दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. थोडेसे का होईना पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरीक यावर संतुष्ट होते. मात्र १५ दिवसापासून एक दिवसाआड केवळ दोन गुंडच पाणी येत होते. १७ ते २० मे या कालावधीत नळाला पाणी न आल्यामुळे टिळक वॉर्ड, वडेगाव येथील नागरिकांनी नगर पंचायतीत धडक दिली. त्यानंतर प्रशासक हरीचंद्र मडावी यांनी तोडगा काढण्याचे निर्देश दिले. सुर नदीवर मोहाडी नळ योजनेची विहिर आहे. सुरनदी कोरडी पडलेली असल्याने विहीरला पाणी नाही. त्यामुळे नळाला एक दिवसाआड पाणी देण्यात येत असल्याचे नगर पंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र सुरनदीत पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आले नाही. (शहर प्रतिनिधी)
तहसीलदारांचे निर्देश
सूर नदीला पेंचचे पाणी सोडण्यात येत असून सुनिल गिरीपुंजे यांच्या कार्यकाळात ते सोडण्यात आले होते हे नगरपंचायत प्रशासक तथा तहसिलदार हरिश्चंद्र मडावी यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी पेंच प्रकल्पाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करुन निर्णय घेता येईल, असे आश्वासन देऊन नगर पंचायत कर्मचाऱ्यांना तसे पत्र तयार करण्याचे निर्देश दिले आहे.