मोदी लाटेवर एकहाती विजय
By Admin | Updated: May 17, 2014 23:33 IST2014-05-17T23:33:26+5:302014-05-17T23:33:26+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात हंसराज अहीर यांच्या विजयाने हॅटट्रिक साधली आहे. आजवरच्या त्यांच्या तीन निवडणुकांमध्ये न साधलेले मताधिक्य यावेळी मिळाल्याने या ..

मोदी लाटेवर एकहाती विजय
आढावा मतदारसंघाचा :काँग्रेसमधील गृहकलह भाजपाच्या पथ्यावर
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात हंसराज अहीर यांच्या विजयाने हॅटट्रिक साधली आहे. आजवरच्या त्यांच्या तीन निवडणुकांमध्ये न साधलेले मताधिक्य यावेळी मिळाल्याने या मतदार संघातील भाजपाचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. असे असले तरी मोदींच्या लाटेमुळे या विजयातील झळाळीत पुन्हा भर पडली आहे. आजवर भाजपाचा कधी नव्हे एवढ्या मताधिक्याने येथे विजय झाल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मोदी लाटेचा पुरेपूर फायदा येथे हंसराज अहीर यांना मिळाला आहे. प्रारंभी या मतदार संघातील लढतीचे चित्र तिरंगी दिसत होते. मात्र अहीर यांनी एकहाती लढाई मारली. त्यांच्या मतांची लिड दोन्ही नजिकच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मतांच्या बेरजेलाही मागे टाकणारी आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रात भाजपाला मिळालेली मते महत्वाची मानली जात आहेत. या सोबतच वणी क्षेत्रातही आपली बाजू कायम राखण्यात अहीर यशस्वी झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला खुद्द घरातूनच (वरोरा क्षेत्रातून) फटका बसला आहे. या ठिकाणी भाजपाने घेतलेल्या मतांसोबतच आपचे उमेदवार अॅड. चटप यांनीही मते मिळविली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाल्याने त्याचा तोटा काँग्रेसला सहन करावा लागला आहे. राजुरा क्षेत्रात चटप यांनी आपल्या मतांची मक्तदारी कायम राखली आहे. असे असले तरी येथेही जवळपास सहा हजार मतांनी भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. निकालाचा कल कळताच कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच असा विजयी जल्लोष सुरू केला होता.