भंडारा : नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवित साकोलीतील तलाव वाॅर्डात मोबाईल मनोऱ्याचे बांधकाम पूर्णत्त्वास जात आहे. मानवी जीवापेक्षा मोबाईल मनोऱ्याचे बांधकाम महत्त्वाचे आहे काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत असून, स्थानिक प्रशासनातर्फे कारवाईसंदर्भात प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पालिकेत कुठलाही ठराव न घेता बांधकाम करण्यात आले आहे.
साकोलीतील तलाव वाॅर्डात मोबाईल मनोऱ्याच्या बांधकामासंदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी बांधकामाला परवानगी दिली होती. तेव्हा पालिकेत कुठल्याही प्रकारचा ठराव पारित करण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे याची याबाबत कुणालाही कल्पनाही देण्यात आली नाही. वाॅर्ड नगरसेवकांना विश्वासात घेतले किंवा नाही, याचीही कुजबूज आता वाॅर्डात सुरू आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात ‘टाॅप टू बाॅटम’ सेटिंग केली असल्याने कुणीही बोलायला तयार नाहीत. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनीही मोबाईल मनोरा बांधकामासंदर्भात माहिती गोळा करण्याचे कार्य सोपविल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर त्यांची ठोस भूमिका दिसून आली नाही. एकंदरीत यंत्रणाच भ्रष्टाचारात सहभागी असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे फार सोपे झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोबाईल मनोऱ्यातील रेडिएशनमुळे काय परिणाम जाणवतील, याची कल्पना प्रशासनाने केली नसावी काय?