मोबाईल धारकांच्या खिशाला झळ
By Admin | Updated: October 30, 2014 22:47 IST2014-10-30T22:47:56+5:302014-10-30T22:47:56+5:30
सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे. याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत

मोबाईल धारकांच्या खिशाला झळ
ग्राहकांमध्ये संताप : विविध सेवांचा अनावश्यक भार
भंडारा : सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे. याचाच फायदा सिमकार्ड कंपन्यांनी घेतला असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. ट्रायने याकडे लक्ष देत सिमकार्ड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांद्वारे करण्यात येत आहे.
मोबाईल धारकांना सेवा देणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांनी विविध योजनांची प्रलोभने देत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सुरू केला आहे. एखाद्या योजनेच्या लोभाला पडून ग्राहक सेवा घेतात; पण जेव्हा बिल द्यावे लागते, तेव्हा कपाळावर हात ठेवतात.
मोबाईल सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलवर आपल्या मजीर्ने अनेक सुविधा सुरू करीत आहे. ग्राहकांची परवानगी न घेता आपल्याकडील उपलब्ध सेवा बहाल करतात. यात डायलटोन, भजन, राशी-भविष्य, संगीत, क्रिकेट स्कोअर, इंटरनेट आदींचा समावेश आहे. या सुविधा ग्राहकांना पूर्वसूचना न देताच सुरू केल्या जात आहेत. यामुळे मोबाईल धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याबाबत ग्राहक सेवा केंद्रातून समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याने ग्राहकांद्वारे संताप व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार जबरदस्तीचा असून कपात केलेली रक्कमही ग्राहकांना परत केली जात नाही. एक-दोन दिवसांनी पैसे जमा होतील, असे सांगितले जाते; मात्र तसे घडताना दिसत नाही. ग्रामीण भागात भारत संचार निगमची सेवा उत्तम असल्याने ग्राहकसंख्या अधिक आहे; पण या कंपनीच्या अतिरिक्त सेवा ग्राहकांच्या चुकीने एकदा सुरू झाल्या की, त्या बंद करण्याचा कुठलाही मार्ग ग्राहकांना उपलब्ध होत नाही. अखेर ग्राहकांना ते सिमकार्ड रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. असाच प्रकार अन्य खासगी सिमकार्ड कंपन्यांकडूनही केला जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या या प्रकारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.
शहरी भागातील नागरिक असे कॉल वा मॅसेज आले तर ते उचलत नाहीत; पण ग्रामीण भागात याबाबत जागृती नसते.
यामुळे ग्रामस्थांच्या मोबाईलवरच या सेवांचा अधिक भार पडत असल्याचे दिसून येत आहे. यावर नियंत्रणासाठी असलेल्या ट्रायचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना मात्र मनस्ता सहन करावा लागतो. (नगर प्रतिनिधी)