चार लाखांचा सागवान मातीमोल !

By Admin | Updated: August 31, 2016 00:21 IST2016-08-31T00:21:02+5:302016-08-31T00:21:02+5:30

नोव्हेबर २०१५ पासून वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याअभावी लाखांदूर वनविभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या .....

Mithimol of four lakh sagar! | चार लाखांचा सागवान मातीमोल !

चार लाखांचा सागवान मातीमोल !

लाखांदूर तालुक्यातील प्रकार : वर्षभरापासून शेतकऱ्यांची वनविभागाच्या कार्यालयात पायपीट
लाखांदूर : नोव्हेबर २०१५ पासून वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याअभावी लाखांदूर वनविभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या खसऱ्यातील लाकडांचे विल्हेवाट झाले नाही. परिणामी वर्षभरापासून खुल्या मैदानात उन्हपावसात असलेले सागवानाची लाकडे मातीमोल झाली आहेत. अधिकारी कंत्राटदारांच्या मर्जीने काम करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी वनमंत्र्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
मागील पाच महिन्यापासून लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयातील तीन वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची बदली झाली. याच कालावधीत साकोलीचे सहायक वनसंरक्षक हे असल्यामुळे त्यांचे खसरे प्रकरणात चांगलेच फावले. लाखांदूर वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात नोव्हेबर २०१५ पासून शेतकरी व कंत्राटदाराचे खसरे प्रकरण अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे रखडले आहे. यात कंत्राटदारांची कामे तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांच्या कामांमध्ये त्रुट्या काढण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
साकोली कार्यालयात खसरे प्रकरण रखडले असून या प्रकरणाच्या फाईल्सचा लाखांदूर ते साकोली असा प्रवास सुरू आहे. शेतातील कापलेली लाकडे शेतात पडून आहेत काही शेतकऱ्यांनी तोडलेली लाकडे पावसाच्या व चोरीच्या भीतीने सुरक्षितस्थळी आणून ठेवली. आज ना उद्या साकोलीचे सहायक वनसंरक्षक हे परवानगी देतील यासाठी काही शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेऊन खरिपाची पीक न घेता आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
शेतकऱ्यांनी स्वत: केलेल्या खसऱ्याचे प्रकरण साकोलीचे सहायक वनसंरक्षकानी पाच ते सहा महिने ठप्प ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मागील आठ माहिन्यापासून खसरे प्रकरणाची तपासणी केली असता एकाही शेतकऱ्याचे स्वत: केलेले प्रकरण निकाली काढले नाही. याऊलट कंत्राटदारांची प्रकरणे निकाली निघाल्याचे तपासात दिसून आले आहे. यापुर्वी पास केलेले खसरे प्रकरणाची झाडाच्या बुंध्यासकट मोजणी केली असता अवैध वृक्ष कटाईचे घबाड उघडकीस येऊ शकते.
साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षकांनी वारंवार होणाऱ्या वन परिक्षेत्राधिकारी यांच्या बदल्यांचा फायदा घेत जुन्या तारखेत अनेक प्रकरण निकाली काढल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
आपली काम निकाली निघावीत यासाठी काही शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व माध्यमांकडे धाव घेतली. त्यानंतर माध्यमांनी सहायक वनसंरक्षकांशी संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यासंदर्भात लाखांदूर येथील वनधिकाऱ्यांशी संपर्क साधला असत साहेबांचे तोंडी आदेश असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सहायक वनसंरक्षकांनी लाखांदूर वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाला भेट दिली. प्रस्ताव निकाली काढतील या आशेत शेतकरी सागवान लाकडाजवळ ताटकळत बसले होते. परंतु त्यांची कामे मात्र झाली नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी साकोलीचे सहायक वनसंरक्षक यांच्या कामकाजाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी
कंत्राटदारांशी जवळीक साधून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षकांनी सुरु केले आहे. मागील वर्षभरापासून लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मालकी खसरे प्रकरण विनाकारण थांबवून ठेवले आहे. शासन पत्रकानुसार मालकी प्रकरण अर्ज प्राप्त झाल्यापासून ९० दिवसाचे आत प्रकरण निकाली काढणे गरजेचे आहे मात्र तसे झाले नाही. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष नूतन कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

उपवनसंरक्षक लक्ष देतील का ?
स्वत: शेतातील झाडे कापून रीतसर वनविभागाची परवानगी घेणे किती महागात जाते याचा मनस्ताप लाखांदूर येथील शेतकऱ्यांना येत आहे. सहायक वनसंरक्षकांनी लाखांदून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरून कंत्राटदारांना पाठिशी घातल्याने भंडारा उपवनसंरक्षकांनी या प्रकरणात लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लाखांदूर तालुक्यातील मालकी हक्काचे प्रकरण मागील वर्षभरापासून रखडले आहे. सदर प्रकरणाचे जुने पंचनामे रद्द करून नव्याने पंचनामे तयार करून पासिंगकरीता साकोली येथे सहायक वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आले. सह्या चुकल्या म्हणून काही दुरुस्त्या करून पुन्हा साकोली येथील कार्यालयात पाठविले आहे. आमच्याकडून संपूर्ण कार्यालयीन कार्यवाही पूर्ण झाली असून आता हे प्रकरण साकोली येथील सहायक वनसंरक्षक यांच्या दालनात आहे.
-रमेश दोनोडे, वनपरीक्षेत्राधिकारी लाखांदूर.

Web Title: Mithimol of four lakh sagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.