लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : वडिलांनी रागावल्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या कोच्छी येथील २४ वर्षीय युवकाचे प्रेत गावालगतच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मास गळलेल्या आणि सडलेल्या स्थितीतील प्रेत पोलिसांनी गावकरी आणि त्याच्या पालकांकडून शहानिशा करून ओळखले. विनोद ताराचंद मेश्राम असे या मृत युवकाचे नाव आहे.
मागील २ महिन्यांपूर्वी वडिलांनी हटकले असता नाराज झालेल्या मुलाने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना ६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोच्छी येथील जंगल परिसरात उघडकीस आली. या घटनेत स्थानिक कोच्छी येथील विनोद ताराचंद मेश्राम (२४) नामक युवकाचा मृत्यू झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद मेश्राम हा युवक मागील वर्षी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावाजवळील चुलबंद नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. वडिलांनी त्याला मोबाइलवर कॉल केला. मात्र त्याने कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे तो घरी परतल्यावर वडिलांनी त्याला मोबाइलवरील कॉल न स्वीकारल्याबद्दल हटकले आणि रागावले होते. दरम्यान, ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास काही महिला जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता जंगलातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती महिलांनी गावकऱ्यांना दिली. विनोद दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या पालकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्याच्या पालकांनी प्रेताची ओळख पटवून तो विनोदच असल्याचे सांगितले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
कॉल न घेतल्याने वडिलांनी हटकले होते वडिलांनी हटकल्यामुळे संतापलेल्या विनोद कुटुंबीयांना काही एक न सांगता घर सोडून निघून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. या दरम्यान वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार मोठी दिघोरी येथील पोलिसात नोंदविली होती. पोलिसांकडून शोधही सुरू होता. मात्र मागील दोन महिन्यात त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.