प्रशासकाच्या काळातील अंदाजपत्रक दिशाभूल करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 00:49 IST2017-04-23T00:49:54+5:302017-04-23T00:49:54+5:30

नगरपंचायतीच्या प्रशासकांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केलेले अंदाजपत्रक हे जनतेची दिशाभूल करणारे असून

Mismanaging budgets in the administration's time | प्रशासकाच्या काळातील अंदाजपत्रक दिशाभूल करणारे

प्रशासकाच्या काळातील अंदाजपत्रक दिशाभूल करणारे

अंदाजपत्रक नव्याने तयार करा : रवी परशुरामकर यांची मागणी
साकोली : नगरपंचायतीच्या प्रशासकांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केलेले अंदाजपत्रक हे जनतेची दिशाभूल करणारे असून साकोली व सेंदूरवाफा या गावासाठी नाही. त्यामुळे हे सर्व अंदाजपत्रक नमूद करून नागरिकांच्या मागणीनुसार नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात यावे व या अंदाजपत्रकावर प्रशासकाच्या काळातील झालेला खर्च वसुल करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक रवी परशुरामकर यांनी केली आहे.
साकोली नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यावर साकोली नगर परिषदेअंतर्गत शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, नाली सफाई यासारखे विविध महत्वाची कामे असताना प्रशासकांनी या कामाकडे स्पष्ट दुर्लक्ष करून मनमर्जीने फक्त काहीच प्रभागातील कामांना प्राधान्य देऊन कामांचे अंदाजपत्रक तयार करून लाखो रुपये खर्च केले. व इतर विकास कामांकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत पिण्याचे पाणी देण्यात येत होते. मात्र मागील सात आठ वर्षापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन पूर्णत: निकामी झाली. त्यामुळे साकोली येथील गणेश वॉर्ड व तलाव वॉर्ड या दोनच वॉर्डात पाण्याची सोय आहे.
उर्वरीत साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन्ही गावाच्या नाल्यात कचरा पडला होता. नाल्याची साफसफाई करण्यात आली नाही. संडास तयार करण्यात आले नाही. अशी अनेक महत्वपूर्ण कामे प्रशासकांनी केली नाही व फक्त अंदाजपत्रक तयार करून लाखो रुपयाची उधळण केली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक परशुरामकर यांनी केली आहे. प्रशासकांनी मनमर्जीने तयार केलेल्या कामाचे अंदाजपत्रक हे जनतेची दिशाभूल करणारे असून ही कामे प्रत्येक प्रभागातील नाही.
जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय काळातील कामांना प्रशासकीय मागणी न देता ती मान्यता तात्काळ थांबवावी व यास नवीन कामाचा समावेश करावा व जनतेला सहकार्य करावे. (तालुका प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
प्रशासकाच्या काळातील व कामाचे तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रक प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असून दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचेही नगरसेवक परशुरामकर यांनी सांगितले.

 

Web Title: Mismanaging budgets in the administration's time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.