मिश्र रोपवन आगीत भस्मसात
By Admin | Updated: March 24, 2017 00:31 IST2017-03-24T00:31:40+5:302017-03-24T00:31:40+5:30
सन २०१६-१७ मध्ये १२ हेक्टर क्षेत्रात लागवड केलेल्या सुरेवाडा मिश्ररोपवनाला २२ फेब्रुवारी रोजी आग लागली होती.

मिश्र रोपवन आगीत भस्मसात
सुरेवाडा येथील प्रकार : झाडांचे नुकसान, आगीचे कारण गुलदस्त्यात
भंडारा : सन २०१६-१७ मध्ये १२ हेक्टर क्षेत्रात लागवड केलेल्या सुरेवाडा मिश्ररोपवनाला २२ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. आगीमुळे अर्धा हेक्टरमधील झाडांचे नुकसान झाले होते. त्याच रोपवनाला पुन्हा २२ व २३ मार्च रोजी आग लागली. यात ३ ते ४ हेक्टरमधील झाडांचे नुकसान झाले.
सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी अधिकारी गौरी निनावे म्हणतात, मागीलवेळची आग फायर लाईनला लागली होती. एकाही झाडाचे नुकसान झाले नव्हते. आता अडीच हेक्टर क्षेत्राला आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आगीत ३ ते ४ हेक्टरमधील रोपवनाचे नुकसान झाले आहे. झाडांचा कोळसा झाला आहे. रोपवनासाठी चौकीदाराची नियुक्ती असतानाही आग कशामुळे लागली याची माहिती त्यांना नाही. एकाच रोपवनाला दोनदा आग लागत असताना साधी चौकशी करण्यात आलेली नाही.
सन २०१६-१७ मध्ये सुरेवाडा पुनर्वसन जवळ भंडारा वनविभागाकडून कृत्रिम पुननिर्मिती योजनेअंतर्गत मिश्र रोपवनाची लागवड करण्यात आली होती. या रोपवनात साग, बेल, आवळा आदी झाडांची लागवड करण्यात आली. सुमारे १२ हेक्टर क्षेत्रात, कक्ष क्रमांक ९७, गट क्रमांक ९१९ मध्ये सन २०१६-१७ मध्ये सदर रोपवन लावण्यात आले. १२ हेक्टर क्षेत्रात १२,२२१ झाडांची लागवड करण्यात आली. सदर रोपवन सुरेवाडा गावाशेजारी भिलेवाडा ते खमारी मार्गावर आहे.
भिलेवाडा ते खमारी रस्त्याचे बाजूने रोपवनाला २२ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. महिनाभरानंतर पुन्हा लागलेल्या आगीमुळे रोपवनातील झाडे जळून भस्मसात झाली. रोपवनात मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत, कचरा असल्याने झाडांचे नुकसान झाले. आग लागलेली जागा काळीकुट्ट पडली आहे. रोपवनाची लागवड करण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या रोपवनाकडे दुर्लक्ष केले. विडींग व कॅज्युल्टी केवळ दिखाव्यापुरती करण्यात आली. खत व औषधी नाममात्र वापरण्यात आली. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. दोन महिन्यात दोनदा लाग लागली असताना वनपरिक्षेत्राधिकारी एन.एस. भोगे म्हणतात, माहिती हवी असल्यास माहिती अधिकाराचा वापर करावा. चौकीदार कामावर असताना आग कशामुळे लागली हे अधिकाऱ्यांना माहिती नाही? प्रकरण दडपण्यासाठी वनविभागाकडून खटाटोप सुरू आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)