भंडारा : कोरोनाची दुसरी लाट आली असून पहिल्या लाटेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेतही नागरिकांचे गैरसमज कायम आहेत. वृत्तपत्रामुळे कोरोना पसरतो ही अत्यंत चुकीची बाब आहे. कागदामुळे जर कोरोना पसरत असेल तर चलनी नोटामुळे का नाही, असा सवाल भंडारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. नितीन तुरस्कर यांनी केला.
कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी नियम पाळणे गरजेेचे आहे. मात्र कशाचाही अतिरेक करणे अत्यंत चुकीचे आहे. शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता उच्च दर्जाची असेल तर कोणत्याही रोगावर आपले शरीरच मात करते. मनातील भीतीमुळे आजार मनावरही प्रतिबिंबित होतो. मायक्रो ऑरगॅनिझम हे मानवी शरीरातील अविभाज्य घटक आहे. याच्यासोबत आपल्याला आयुष्यभर जगायचे आहे. हेच घटक आपल्यामधील रोग प्रतिकारक क्षमता वाढवायला मदत करतात. कोरोना ही महामारी असली तरी त्याच्यावर सहजपणे मात करता येते. दैनंदिन सवयी बदलल्यास ते सहज शक्य आहे. वारंवार तोंडाला किंवा नाकाला स्पर्श करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. बाहेर निघताना मास्क घालणे आवश्यक झाले आहे. बाहेरून आल्यावर हँडवाॅश करावा.